उद्योजकांना पाचपट ज्यादा वीज बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:06 AM2020-07-03T00:06:37+5:302020-07-03T00:08:02+5:30
लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद असताना जिल्ह्यातील उद्योजकांना पाचपटीने वीज बिल आकारणी केल्याने आयमाच्या वतीने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सातपूर : लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद असताना जिल्ह्यातील उद्योजकांना पाचपटीने वीज बिल आकारणी केल्याने आयमाच्या वतीने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
उद्योजकांना अवाजवी वीज बिले आकारण्यात आल्याने आयमा कार्यालयात बैठक घेण्यात आली. अंबड, सातपूर, सिन्नर, गोंदा यांसह उद्योजकांना लॉकडाऊन काळातील वीजबिल चार ते पाचपटीने अधिक आल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत.
केव्हीएएच तंत्रप्रणालीनुसार उद्योजकांना त्यांच्या कंपनीतील तांत्रिक घटकांमध्ये बदल करावा लागेल. या सर्व तांत्रिक बाबी सुरळीत करण्यासाठी उद्योजकांना पुरेसा वेळ आवश्यक होता. तोपर्यंत जुन्याच पद्धतीने वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. ज्या उद्योजकांना जास्तीची वीज बिले आली असतील त्यांनी आयमाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही वीजबिले कमी व्हावीत यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय आयमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
केव्हीएएच तंत्रप्रणालीनुसार वीज बिल
उद्योजक अनेक संकटांचा सामना करीत असताना, कारखाने बंद असताना वाढीव वीज बिलांमुळे उद्योजक अधिकच अडचणीत आले असल्याचे आयामाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी सांगितले. पूर्वी वेगळ्या तंत्रप्रणालीनुसार विजेची बिले येत होती. आता १ एप्रिलपासून केव्हीएएच या तंत्रप्रणालीनुसार वीज बिल देयके आकारण्यास सुरुवात केली आहे.