पाणीकपातीमुळे सिन्नर तालुक्यातील उद्योजक संतप्त
By admin | Published: May 23, 2016 11:32 PM2016-05-23T23:32:13+5:302016-05-23T23:33:16+5:30
निमा बैठक : सेवाकर, फिक्स चार्ज न भरण्याचा घेतला निर्णय
सिन्नर : गेल्या आठवड्यापासून औद्योगिक वसाहतीत पाण्याचा पुरवठा होत नसल्याने उद्योजकांनी बैठक घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. सध्याच्या पाणीपुरवठा स्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजकांनी दिला.
माळेगाव औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीचे उपअभियंता, निमा संस्थेचे पदाधिकारी व उद्योजक यांची पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. एमआयडीसीने २५ टक्के पाणी कपात घोषित केली असली तरी प्रत्यक्षात ८० टक्के कपात सुरू असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे सेवाकर व फिक्स चार्ज न भरण्याचा निर्णय उद्योजकांनी जाहीर केला. २५ तारखेला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. परंतु तोपर्यंत चेहडी पंपिंग स्टेशनमधील शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन एमआयडीसीचे उपअभियंता पी. के. पाटील यांनी दिले. एमआयडीसीमध्ये १८ एमएलडी पाणी साठवण क्षमता असून, संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला रोज सुमारे १० एमएलडी पाणी लागते. तालुक्यातील गावे व उपनगरांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याविषयी उद्योजकांची हरकत नाही. तथापि, अजून ५ एमएलडी पाणी उचलून त्याचा योग्य तो पुरवठा उद्योजकांना करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी बी व सी ब्लॉकमध्ये एमआयडीसीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली.
यावेळी निमाचे अतिरिक्त चिटणीस आशिष नहार, तक्रार समितीचे सुधीर बडगुजर, किरण खाबिया, एस. के. नायर, एम. जी. कुलकर्णी, रवींद्र राठोड, विजय अष्टुरे, किशोर इंगळे, भुपेंद्र नलावडे, एल. एस. डोळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)