महिला मजुरांची चक्क कारमधून एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 09:56 PM2021-11-23T21:56:32+5:302021-11-23T21:56:32+5:30
चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.
चांदोरी : काळाचा महिमा काही औरच असतो. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याबाबत ते नेहमी स्वप्न पाहत असतात, मात्र एसटी संपामुळे का होईना पण कारमधून जाण्याचे स्वप्न अखेर काही दिवसांकरिता पूर्ण होत असून, शेती काम करण्यास जाताना व येताना वाहनाची कोणतीही सोय नसल्याने अखेर मालकाच्या कारमधून जाण्याचे भाग्य या शेतमजुरांना लाभत आहे.
मारुती कारमधून शेतमालक कांदे लावण्यासाठी, सोयाबीन सोंगणी आदी कामासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून सोडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे.
शेतीची काम करायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर कांदे लावण्यासाठी त्यांना वाफ्यात रोप खांडून द्यावे लागते, तर सोयाबीन फक्त सोंगून देणार गंज शेतकऱ्याला करावा लागतो, त्यांना जाताना चुलीसाठी लाकडे द्यावी लागतात.
आणखी शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच करावी लागते. मजुरी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.
शेतमालाचा भाव कमी तर उत्पादन खर्च वाढत असल्याने, शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा अवकाळी व परतीच्या पावसाने सोयाबीन व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. आता अनेकांनी सोयाबीन काढून गहू, हरभरा पिकासाठी मशागत व पेरणी सुरू केली आहे.
शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी-शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे.
कांदे लागवड, द्राक्ष बागेतील कामे व इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने-आण करत आहेत. निंदणी, खुरपणी, खत देणे हे सर्व मजूर करतात,शेतीच्या या सर्व कामाचा खर्च काढला तर शेतकऱ्याच्या हाती फार काही उरत नाही. मात्र शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे.
- प्रणव शंखपाळ, शेतकरी, कारसुळ.