केनिंगस्टन क्लबला पर्यावरण विभागाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:56 AM2018-06-30T00:56:11+5:302018-06-30T00:56:26+5:30
माजी महापौर प्रकाश मते यांना ४८ तासांत दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणाऱ्या महापालिकेने आता याच कालावधीत पर्यावरण विभागाची दुसरी नोटीस धाडली आहे. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.
नाशिक : माजी महापौर प्रकाश मते यांना ४८ तासांत दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणाऱ्या महापालिकेने आता याच कालावधीत पर्यावरण विभागाची दुसरी नोटीस धाडली आहे. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पूररेषतील बांधकामे हटविण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर याच मालकाच्या ग्रीन फिल्डवर हातोडा चालविण्यात आला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही या लॉन्सची भिंत हटविल्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि महापालिका आयुक्तांना न्यायालयात माफीनामा मागण्याची वेळ आली. त्यानंतर केनिंगस्टन क्लबला आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्याच दिवशी नोटीस दिली होती. या क्लबच्या संरक्षक भिंतीमुळे महापालिकेची गोदापात्रातील गॅबियन वॉल ढासळली असून, त्याबाबत नोटीस बजावली होती; परंतु हा क्लब महापालिका हद्दीत नसून जलालपूर हद्दीत येत असल्याने संचालकांनी त्यास आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेने जिल्हाधिकाºयांमार्फत कारवाईचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी हा विषय पालिकेकडेच टोलवला. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने गॅबियन वॉलच्या नुकसानीपोटी सुमारे दीड कोटी रुपयांची भरपाई ४८ तासांत करण्याची मागणी केली आहे. या नोटिसीला २४ तास उलटत नाही तोच आता महापालिकेच्या पर्यावरण विभागानेदेखील नोटीस बजावली आहे. नदीपात्रात भराव पडल्याने प्रवाहाला अवरोध निर्माण झाला असल्याचा आक्षेप घेण्यात आला असून अन्य मुद्दे गुरुवारी (दि. २८) दिलेल्या नोटिसीप्रमाणेच आहेत.
महापालिकेने या क्लबला गॅबियन वॉलच्या नुकसानभरपाई पोटी १ कोटी ४८ लाख रुपये देण्याची मागणी केली असून, त्यासाठी दिलेली ४८ तासांची मुदत शनिवारी (दि. ३०) संपणार आहे. संंबंधित क्लब संचालक ही रक्कम भरतात की विरोध करतात, याकडे लक्ष लागून आहे.