सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:28 PM2018-01-24T23:28:01+5:302018-01-25T00:03:11+5:30
शेतकर्यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले.
सिन्नर : शेतकर्यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी येथील भगवती लॉन्स येथे पार पडली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आर. व्ही. पाटील, रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके, जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक अनिल माने, भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी आदी उपस्थित होते. यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांतील अनुभव पाहता पर्यावरण सुनावणी केवळ प्रशासकीय प्रक्रिया असल्याचा आक्षेप शेतकर्यानी घेतला. विविध प्रकल्पांत लाखो झाडांची कत्तल यापूर्वीही झाली आहे.
मात्र एकाच खड्ड्यात अनेकदा झाडे लावली. यापूर्वी कधीही आश्वासने पाळली गेली नाही. सध्याच्या सुनावणीनंतर ती पाळली जाणार नसल्याचे भाकीत शेतकºयांनी केले. त्यामुळे प्रशासनाइतका वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही शेतकर्यानी दिला. काम सुरू असताना पाण्याचे प्रदूषण काही काळापुरते होऊ शकेल. आजूबाजूला धूळ उडणार असली तरी ती घालविण्यासाठी जागोजागी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषण थांबविण्या-साठी मुंबई आयआयटीने बनविलेले नॉइस बॅरिअर जिल्ह्यात ६ किलोमीटर बसविण्यात येणार आहेत. जेवढी वनजमीन जाणार आहे तेवढीच उपलब्ध करून तितक्याच झाडांची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यातील समृद्धबाधित गावांच्या पर्यावरण जनसुनावणीसाठी केवळ सुमारे १०० शेतकºयांची उपस्थिती लाभली.
द्राक्ष, टमाटे नष्ट होण्याची भीती
प्रकल्प झाल्यावर झाडे लावली जात नाहीत, महामार्गाच्या भरावासाठी टेकड्या नष्ट केल्या जातील याची हानी कशी भरून काढणार, असा आक्षेप विष्णू हारक या शेतकर्याने घेतला. सिन्नर-घोटी महामार्गाच्या प्रदूषणाने भात पीक नष्ट झाले असून, आता समृद्धीमुळे द्राक्ष, टमाटे पिके नष्ट होतील याची भीती व्यक्त केली. सोमनाथ वाघ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पाण्याचे नष्ट होणारे स्रोत परत कसे मिळविले जाणार, असा सवाल उपस्थित केला.