गोदावरीच्या तळ कॉँक्रीकीटणामुळेच पर्यावरणीय समस्या: उत्तमराव निर्मळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:00 AM2019-12-15T00:00:03+5:302019-12-15T00:05:04+5:30
नाशिक : गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले.
नाशिक :गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केले. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने गोदापात्रातील तळ कॉँक्रीटीकरण काढण्यात येणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत असतानाच त्यास आक्षेप घेतल्याने काम थांबविण्यात आले असून त्यावर मतभिन्नता आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्मळ यांच्याशी साधलेला हा संवाद..
प्रश्न- नदीचा विशीष्ट भागात तळ कॉँक्रीटचा असला पाहिजे किंवा नको असे दुमत सध्या नाशिकमध्ये जाणवत आहे. त्याबद्दल तुमचे मत काय?
निर्मळ- नदी ही नैसर्गिकरीत्या प्रवाही असली पाहिजे. त्यामुळे पाणी प्रवाही राहाते आणि पाण्यातील तर त्यातील जैविक साखळी कायम राखली जाते. नदीपात्र मोकळे असेल तर सूर्यकिरणे तळापर्यंत पोहचतात आणि बॅक्टेरीया पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करतात. परंतु नदीचे तळ कॉँक्रिटीकरण केल्यास त्यातील बॅक्टेरीया राहत नाही. पाण्याला साचलेपणा येतो. आणि त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात.
प्रश्न- कॉँक्रिटीकरणामुळे नक्की काय अडचणी येतात?
निर्मळ- कॉँक्रिटीकरण केल्यामुळे नदीपात्रात पाणी साचले की ते कुजते आणि त्याला दर्प येतो. नाशिकमध्ये राहून अनेक नागरिक रामकुंडाचे पाणी पिण्यास धजावत नाही. पाणी साठल्यानंतर ते शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नसल्याने कुजते आणि त्यामुळेदेखील दर्प येतो.
प्रश्न- गोदावरी नदीच्या कॉँक्रीटीकरणाबाबत मत काय?
निर्मळ- नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात तळ कॉँक्रिटीकरण करण्यात आले आणि घाटदेखील बांधण्यात आले आहे. यामुळे नदीपात्राची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीची अवस्था बिकट झाली असून, गोदावरी कॉँक्रिटीकरणातून मुक्त करण्याची गरज आहे. मी नाशिकमध्ये जलसंपदा विभागात कार्यरत असताना देखील तळ कॉँक्रिटीकरण काढावे असे मी सूचवले होते.
मुलाखत- संजय पाठक