त्या आम्रवृक्षाला पर्यावरणप्रेमींनी वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:37+5:302021-01-23T04:15:37+5:30
नाशिक : कोणत्याही प्रकारे रस्त्यात अडथळा नाही की कुणाला फांद्याचा त्रास नाही. सावली देण्याचे अखंड व्रत अंगीकारणाऱ्या त्या आम्रवृक्षावर ...
नाशिक : कोणत्याही प्रकारे रस्त्यात अडथळा नाही की कुणाला फांद्याचा त्रास नाही. सावली देण्याचे अखंड व्रत अंगीकारणाऱ्या त्या आम्रवृक्षावर भल्या सकाळी कोणी तरी कटर चालवले आणि चांगली फळे देणारा हा आम्रवृक्ष कोसळला. कोणा पर्यावरणप्रेमींच्या जागरुकतेमुळे झाड तेथेच टाकून कत्तल करणारे पळाले. ते सीसीटीव्हीत कैदही झाले. परंतु, ते सापडले नाहीत की कारवाई झाली नाही. त्यामुळे हटकलेल्या पर्यावरणप्रेमींनी या ठिकाणी मेणबत्त्या पेटवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. एक वृक्ष गेला तर हजारो वृक्ष लावून हरित नाशिक कायम ठेवू या, अशी मागणी यावेळी झालेल्या शाेकसभेत केली.
नाशिक शहरात जवळपास ४७ लाख वृक्ष असल्याची नोंद आहे. मात्र, अनेक ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. गेल्या आठवड्यात कारण नसताना अशाच प्रकारे डिसूझा कॉलनीत एक वृक्ष भल्य सकाळी अचानक कटर लावून तोडण्यात आला. काही जागरुक नागरिकांनी हटकल्यानंतर संबंधित पसार झाले. परंतु, ते सीसीटीव्हीत कैद झाले. यानंतरही महापालिकेने पोलिसांत तक्रार करण्यापलीकडे काहीच करीत नाही. त्यामुळे हे अभिनव प्रकारचे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारती जाधव यांनी झाडे तोडणारे सीसीटीव्हीत तोडताना दिसत असताना कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिका करीत नाही, हे खेदजनक असल्याचे मत व्यक्त केले तर अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे वृक्षतोड झालेल्या ठिकाणी किमान दुसरे उंच वाढलेले झाड तरी लावले पाहिजे, अशी मागणी जसबीरसिंग यांनी केली. वृक्षांचे मारेकरी मोकाटच, वृक्ष वाचवा नाही तर नाशिक रूक्ष होईल, अशाप्रकारचे फलक घेऊन हेमंत जाधव, विनायक येवला, पंकज जोशी, कुलदीप कौर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
इन्फो...
२३० फौजदारी; पण कारवाईच नाही
शहरात रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या प्लॉटवरील झाडे तोडण्यासंदर्भात सुमारे २३० तक्रारी पोलिसांत करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर पोलीस कारवाई करीत नाहीत आणि महापालिकादेखील पाठपुरावा करीत नाही, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
छायाचित्र क्रमांक..... २२पीएचजेएन १०४....शहरातील डिसूझा कॉलनीतील तोडण्यात आलेल्या आम्रवृक्षाला श्रद्धांजली अर्पण करताना पर्यावरणप्रेमी.