जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:18 AM2019-10-27T01:18:58+5:302019-10-27T01:19:24+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

 Equations in the Zilla Parishad will change | जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार

जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या यापूर्वी दोन जागा रिक्त असून, विधानसभा निवडणुकीनंतर आणखी दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे चार जागांच्या पोटनिवडणुकीनंतर समीकरणांमध्ये आणखी बदल अपेक्षित आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषदेतूनच अनेक आमदार, खासदारांचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला असून, आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी केली. त्यात प्रामुख्याने नितीन पवार, हिरामण खोसकर, यतिन कदम, भास्कर गावित यांनी प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उडी घेतली असली तरी, निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, अर्पणा खोसकर, यतिन पगार या पदाधिकाऱ्यांबरोबरच सीमंतिनी कोकाटे, जयश्री पवार, सयाजीराव गायकवाड, आत्माराम कुंभार्डे, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, मंदाकिनी बनकर, किरण थोरे आदी सदस्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी उघड उघड प्रचार केला आहे, तर काहींनी थेट पक्ष भेद विसरून विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्याही प्रचारात भाग घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलली असून, जिल्हा परिषदेचे हिरामण खोसकर व नितीन पवार हे दोघे सदस्य विधानसभेची पायरी चढली आहेत. यतिन कदम, भास्कर गावित हे अपयशी ठरले आहेत.
लोकसभा निवडणुकीतही राष्टÑवादीच्या सदस्य डॉ. भारती पवार सेनेचे सदस्य धनराज महाले यांनी पक्षांतर करून लोकसभा निवडणूक लढविली. त्यातील डॉ. पवार यशस्वी झाल्या तर महाले यांना घरी बसावे लागले. मात्र या दोघांनाही जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दोन्ही निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.
निवडणुकीत काहींनी पक्षाचे तर काहींनी विरोधात कामे केल्यामुळे त्याची दखल प्रत्येक पक्षाने घेतली आहे. मनीषा पवार यांनी पती रत्नाकर पवार यांच्यासाठी भाजपच्या विरोधात काम केले तर सीमंतिनी कोकाटे या भाजपच्या सदस्य असताना त्यांनी वडील माणिकराव कोकाटे यांच्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसचा उघड उघड प्रचार केला आहे. अर्पणा खोसकर या राष्टÑवादीच्या असल्या तरी, त्यांनी वडील हिरामण खोसकर यांच्यासाठी कॉँग्रेसचा प्रचार केला तर नयना गावित या कॉँग्रेसच्या असूनही त्यांनी आई निर्मला गावित यांच्यासाठी सेनेचा प्रचार केला आहे. त्यामुळे आगामी पदाधिकारी निवडीसाठी राजकीय समीकरणे जुळविताना सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ही बदललेली राजकीय समिकरणे आता जिल्हा परिषदेच्या राजकारणावर कोणते परिणाम घडवितात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन जागा गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून, त्यात आता नाशिक तालुक्यातील गोवर्धन गट व कळवण तालुक्यातील कनाशी गटाच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे.
आजवर लोकप्रतिनिधी झालेले सदस्य
जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले अनिल कदम, नरहरी झिरवाळ, धनराज महाले, शिरीष कोतवाल, माणिकराव कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे, शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ आदींनी अगोदर जिल्हा परिषदेची पायरी चढली व नंतरच त्यांना विधिमंडळ, संसदेत पोेहोचणे शक्य झाले आहे.

Web Title:  Equations in the Zilla Parishad will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.