कळवण तालुक्यात इंटरनेट सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:51 AM2018-03-01T00:51:40+5:302018-03-01T00:51:40+5:30
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला असून, नेटवर्क लिंक मिळत नसल्याने बॅँकांसह शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दळवट शाखा इंटरनेट सेवा तब्बल नऊ तास ठप्प झाल्याने आदिवासी बांधवासह महिलांना ताटकळावे लागले.
कळवण : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला असून, नेटवर्क लिंक मिळत नसल्याने बॅँकांसह शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दळवट शाखा इंटरनेट सेवा तब्बल नऊ तास ठप्प झाल्याने आदिवासी बांधवासह महिलांना ताटकळावे लागले. मंगळवारी (दि. २७) दिवसभर सकाळी ११ ते ५ व आज बुधवारी तीन तास नेटवर्क लिंक नसल्याने आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने मंगळवारी व बुधवारी अनेकांना माघारी फिरावे लागले. होळी सणाच्या उत्सवासाठी आदिवासी बांधवांनी मंगळवारी जिल्हा बॅँकेच्या दळवट शाखेत धाव घेतली होती. जिल्हा बॅँक आर्थिक संकटात असताना नेटवर्क लिंक होत होते. आता व्यवहार सुरळीत होत असून, ग्राहकांचे समाधान बॅँकेकडून केले असताना केंद्रीय सेवेचा बोजवारा उडाल्याने आदिवासी जनतेने नाराजी व्यक्त केली. तब्बल नऊ तासांनंतर नेटवर्क लिंक जोडले गेल्यानंतर बॅँकेने आर्थिक व्यवहार
केल्याने आदिवासी बांधवांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दळवट परिसरातील आदिवासी शेतकरी लघु, मोठे व्यावसायिक तसेच नोकरदार, सर्वसामान्य ग्राहकांसाठी जिल्हा बॅँकेची शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने या बॅँकेतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. शिवाय बँकेचे कामकाज आॅनलाइन झाले आहे. बुधवारी (दि. २८) सकाळी ११ वाजेपासून बीएसएनएल नेटवर्क लिंक होत नसल्याने जिल्हा बॅँकेच्या दळवट शाखेबाहेर आदिवासी ग्राहकांनी तब्बल तीन तास ठिय्या मांडला.