दहावीच्या १७० विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:00 AM2019-11-24T01:00:40+5:302019-11-24T01:01:03+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणपडताळणीसाठी २४४ विद्यार्थ्यांनी, तर छायांकित प्रति मिळविण्यासाठी ८१५ व पुनर्मूल्यांकानासाठी १९२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणपडताळणीसाठी २४४ विद्यार्थ्यांनी, तर छायांकित प्रति मिळविण्यासाठी ८१५ व पुनर्मूल्यांकानासाठी १९२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांचे निकाल बदलून ते उत्तीर्ण झाले. परंतु विद्यार्थ्यांना हे निकाल मिळविण्यासाठी जवळपास जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाच्या फेºयात अडकलल्या विद्यार्थ्यांना अर्ज करताना कमी वेळ मिळाला होता, तर जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालाबाबतीतही असाच प्रकार समोर आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर गुणपडताळणीसाठी २४, छायांकित प्रतिसांठी ४१ व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्राप्त झाले होते. यातील पुनर्मूल्यांकनात सहा प्रकरणांमध्ये गुणांमध्ये बदल झाला असून, एका निकालात बदल झाला, तर एक प्रकरण प्रलंबित असून, त्यावरील निकाल अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारे पेपर तपासणीत राहणाºया त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने पेपर तपासणीतील उणिवा दूर करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४ विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व मनस्ताप सहन करावा लागत असून, पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याच्या कालावधीत फेºया घालाव्या लागत आहेत.
पेपर तपासणीनंतर प्राप्त गुणांविषयी शंकांची पडताळणी करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची नियमित प्र्रक्रिया आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करण्यासोबतच छायांकित प्रत प्राप्त करून तिच्या फेरमूल्यांकनासाठी अर्जही करता येतो. त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये अथवा निकालात बदल होऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित संस्थेला केल्या जातात. पेपर तपासणीत निष्काळजीपणा झाल्याचे समोर आल्यास संस्थेला सूचना करून संबंधित शिक्षकांवर वेतनवाढ रोखणे, विभागीय चौकशी, शिस्तभंग कारवाई अथवा निलंबनाचीही कारवाई करण्यात येते. तसेच या प्रकाराची शिक्षकाच्या सेवापुस्तिकेवर नोंद करून त्याची छायांकित प्रत विभागीय मंडळाकडून मागविली जाते.
- नितीन उपासनी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक