राज्यातील ईएसआय लाभार्थींना खासगी रुग्णालयातून उपचारास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 04:00 PM2020-07-13T16:00:33+5:302020-07-13T16:01:30+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार विमा योजना (ईएसआय) लाभार्थी कामगारांनी अत्यावश्यक वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. ईएसआयच्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.
सातपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार विमा योजना (ईएसआय) लाभार्थी कामगारांनी अत्यावश्यक वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यांना वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. ईएसआयच्या या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.
कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्य कामगार विमा महामंडळाकडून राज्य कामगार विमा योजना रु ग्णालयातून कामगार आणि त्याच्या कटुंबीयास वैद्यकीय उपचार दिले जात होते. आता राज्यातील कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे राज्य कामगार विमा सोसायटीच्या विमाधारक कामगारांना उपचारासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार अशा कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निकडीच्या वेळी खासगी रु ग्णालयात उपचार घेतल्यास त्यास केंद्र सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत दराप्रमाणे वैद्यकीय खर्चाचा परतावा दिला जाणार आहे.
महाराष्ट्र कामगार विमा सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सूचनेद्वारे म्हटले आहे की, विमेधारकांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणांमध्ये एकसमानता, सुसूत्रीकरण तसेच जलदगतीने निपटारा करण्यासाठी दि.१ आॅगस्टपासून आकस्मित किंवा निकडीच्या प्रसंगी खासगी रु ग्णालयातून उपचार घेतल्यास सी.जी.एच.एस. पॅकेज दरानुसार वैद्यकीय परतावा देण्यात येणार आहे.
कोविड-१९ मुळे जिल्हा प्रशासनाने राज्यातील सुमारे ८ ईएसआय रु ग्णालय ताब्यात घेतलेले आहे. त्यामुळे लाभार्थींना (विमाधारक) ईएसआय रु ग्णालयातून उपचार मिळू शकत नाहीत. अशावेळी खासगी रु ग्णालयातून उपचार घेतल्यास शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार वैद्यकीय परतावा मिळण्याची सोय केली असावी. याबाबत आमच्याकडे सविस्तर अधिकृत माहिती आलेली नाही.