प्रस्थापित प्रसारमाध्यमे विचारधारांसह जनमानसांपासून दुरावली
By admin | Published: May 28, 2017 01:25 AM2017-05-28T01:25:57+5:302017-05-28T01:31:51+5:30
नाशिक : भारतासह विविध देशांमधील प्रस्थापित प्रसारमाध्यमे पूर्वग्रहदूषित झाली आहेत.
नाशिक : भारतासह विविध देशांमधील प्रस्थापित प्रसारमाध्यमे पूर्वग्रहदूषित झाली आहेत. जनमाणसातील बदलणारे मतप्रवाह, भावना जाणून न घेता प्रसारमाध्यमे मर्यादित भूमिका मांडत असल्याने अमेरिकेसह भारत आणि देश-विदेशांतील प्रस्थापित प्रसारमाध्यमे समाजातील नागरिकांपासून व विचारधारेपासून दुरावत चालली आहेत. प्रसारमाध्यमे आणि लोकांमध्ये वैचारिक दरी निर्माण होत असल्याची खंत महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी व्यक्त केली.
शंकराचार्य न्यास, सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचार विभागातर्फे डॉ. कुर्तकोटी सभागृहात नारद जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ता सराफ व नरहरी भागवत यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी नारद पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच वृत्तपत्रांना समाजातील विविध समस्यांबाबत अवगत करून देणाऱ्या वाचक पत्रलेखकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. चंद्रकांत वाघुलीकर व छाया जाधव यांना पत्रलेखक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नितीन ठाकरे, विजय कदम व मिलिंद कांबळे उपस्थित होते.