आपत्कालीन मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:46+5:302021-05-17T04:12:46+5:30
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून संभाव्य मुसळधार पाऊस, ...
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून संभाव्य मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटापासून नागरिकांनी स्वत:ची तसेच मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून याबाबतचे नियोजन केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे. नागरिकांनी ०२५३/२३१७१५१या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा, मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक दक्षता बाळगावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार सोसाट्याचा वारा वाहत असताना प्रवास करण्याचे टाळावे, वीज चमकत असताना मोबाइलवर बोलणे टाळावे, पक्की इमारत असेल तेथेच आसरा घ्यावा, मुसळधार पावसात घराबाहेर पडण्याचे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये, शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी, पावसात पर्यटनस्थळी जाऊ नये, सेल्फीचा मोह आवरावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
--इन्फो--
चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हवामान खात्याने याबाबतच्या सूचना केल्या असून या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे, तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.