सातपूर इएसआयसीत कोरोना सेंटर उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:02+5:302021-04-06T04:14:02+5:30
सध्या संपूर्ण शहरात कोविड रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढत आहेत. सातपूर विभागही याला अपवाद नाही, परंतु खेदाची बाब अशी की, ...
सध्या संपूर्ण शहरात कोविड रुग्ण गुणाकार पद्धतीने वाढत आहेत. सातपूर विभागही याला अपवाद नाही, परंतु खेदाची बाब अशी की, सातपूर परिसरातल्या नागरिकांसाठी सातपूर विभागात मनपाचे एकही कोविड सेंटर व रुग्णालय नाही. परिणामी, रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. सातपूर हा कामगार वर्गाचा परिसर आहे. या वर्गाची घरे अतिशय लहान आहेत. त्यामुळे कामगारांच्या घरातील एखादी व्यक्ती कोविड बाधित झाल्यास त्यांना होम क्वारंटाइन होणे शक्य होत नाही. त्याचबरोबर खासगी रुग्णालयाचा आधार घेणेही पैशांअभावी अडचणीचे होत आहे. त्यामुळे सातपूर परिसरातील मध्यम व गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात या आजारामुळे त्रस्त आहे. या वर्गाला दिलासा देण्यासाठी सातपूर परिसरात कोविड सेंटर व रुग्णालय चालू करणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रथमतः सातपूर विभागातील शासनाचे राज्य कामगार विमा रुग्णालयाची मनपातर्फे तत्काळ पाहणी करून ते मनुष्यबळासहीत अधिग्रहित करून, त्यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर आवश्यक सुविधा निर्माण करून गरजू रुग्णांसाठी तत्काळ सुरू करण्यात यावे. अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा मनसे गटनेते सलीम शेख, नगरसेवक योगेश शेवरे, सातपूर विभाग अध्यक्ष प्रकाश निगळ, सोपान शहाणे, सचिन सिन्हा, विजय अहिरे, योगेश लभडे आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
इन्फो
ज्या रुग्णांसाठी घरी होमक्वारंटाइन होण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधील महापालिकेच्या जिजामाता शाळेत कोविड सेंटर तातडीने चालू करावे. या रुग्णांना या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांचेवर आवश्यक तो उपचार करण्यात यावा, तसेच प्रभागातील सप्तश्रृंगी मंदिराजवळ अँटजन टेस्टची सुविधा तयार केलेली आहे. तथापि या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या ठिकाणी तत्काळ मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.