रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिवस
By admin | Published: September 28, 2016 12:28 AM2016-09-28T00:28:47+5:302016-09-28T00:29:07+5:30
रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिवस
नाशिकरोड : रेल्वेने दिवसेंदिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, रेल्वेच्या संपत्तीची व प्रवाशांचे संरक्षण करण्याची जबाबदारीदेखील रेल्वे सुरक्षा बलावर आली आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या रेल्वे सुरक्षा बल यशस्वीपणे सांभाळत असून, भविष्यातही त्यांनी उत्कृष्टपणे आपली जबाबदारी पार पाडून नावलौकिक वाढवावे, असे प्रतिपादन एकलहरा कर्षण मशीन कारखान्याचे निर्देशक मधुकर मेश्राम यांनी केले.
रेल्वे सुरक्षा बलाच्या ३२व्या स्थापना दिनानिमित्त सामनगाव रोड येथील आरपीएफच्या प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना मेश्राम म्हणाले की, रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेची संपत्ती व प्रवाशांचे संरक्षण करण्याबरोबर त्यांच्या सामानांचीदेखील संरक्षण केले पाहिजे. तसेच रेल्वच्या कुटुंबातील आरपीएफला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असे मेश्राम यांनी सांगितले. तर प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक आर. पी. पवार यांनी कर्षण कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला सतत मदत होत असते. रेल्वे सुरक्षा बलापुढे वाढत्या अतिरेकी कारवाया आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी ही दोन मोठी आव्हाने आहेत.
मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे नवनवीन गुन्ह्यांचा तपास करावा लागतो. त्याकरिता आरपीएफच्या जवानांना कमांडो प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच रेल्वेचे सायबर सेल असावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी प्रशिक्षणार्थिंनी मान्यवरांना संचलनाद्वारे सलामी देत स्वागत केले. यावेळी अरुण धार्मिक, जुबेर पठाण, ए. के. स्वामी, बी. के. तिवारी, एम. आर. राही, अग्रवाल, संजय गांगुर्डे आदिंसह अधिकारी, जवान उपस्थित होते. (प्रतिनिधी)