लहवित येथे विठ्ठल-रुख्मिणीच्या पादुकांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:54 PM2018-07-29T23:54:25+5:302018-07-30T00:10:03+5:30
गुरुपीठ स्थापनेनंतर ज्ञान, भक्ती आणि धर्म यांचे संस्कार देण्याची गुरू परंपरा सुरू असून, हीच परंपरा अविरतपणे चालविण्यासाठी श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती व चरण पादुका स्थापनेमुळे परिसरात अचल अधिष्ठान निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी केले.
देवळाली कॅम्प : गुरुपीठ स्थापनेनंतर ज्ञान, भक्ती आणि धर्म यांचे संस्कार देण्याची गुरू परंपरा सुरू असून, हीच परंपरा अविरतपणे चालविण्यासाठी श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती व चरण पादुका स्थापनेमुळे परिसरात अचल अधिष्ठान निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी केले. लहवित येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरा चालविण्याकरिता जगद्गुरू विठ्ठलनाथ द्वारा धर्मपीठामध्ये जगद्गुरू डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजानवृक्ष परिसरात सप्तधातूच्या श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेच्या मूर्तीसह पादुकांची स्थापना करण्यात आली. यावेळी संतोषशास्त्री घेवारे यांनी वेदऋचांच्या मंत्रघोषात सरपंच विमल मुठाळ व अंबादास मुठाळ यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करून वाडीचा मळा येथे असलेल्या संत कुटीया येथे कायमस्वरूपी स्थापना करण्यात आली. वारकरी संप्रदायात महत्त्व असलेल्या गुरू परंपरेतील जगद्गुरू विठ्ठलनाथ द्वारा चरणपादुका महापूजन, तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे बेलूकर यांचे गुरुमहिमा या विषयावर संकीर्तन झाले. यावेळी पांढुर्ली आश्रमाचे स्वामी भैरवानंदगिरीजी महाराज, रामकृष्ण लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव, हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे, हभप सुदाम महाराज घाडगे, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे आदींची प्रमुख उपस्थित होती. सायंकाळी वारकरी संप्रदायाचे धर्मानुरागी भाविक व गुरूबंधूंनी आशीर्वचन व संतपूजनप्रसंगी उपस्थित होते.
ओम शांतीनगर
ओम शांतीनगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे, संपत सातपुते, श्रीहरी दळवी, नरहरी मुसळे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांना गुरुसंस्कार महिला बचत गटाच्या वतीने चंद्रकला सातपुते यांनी ५० छत्र्यांचे वाटप केले. तसेच आवळा आदी प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनोज रोकडे, अजय बुलाखे, राजू तागड, संदीप पाळदे, सागर सातपुते, नवीन देवकर आदी उपस्थित होते.
साईबाबा मंदिर
वडनेररोड येथे किरण स्मृती साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यावेळी छावणी परिषदेच्या उपाध्यक्षा मीना करंजकर, तानाजी करंजकर, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, सुनीता कोठुळे, भाऊसाहेब धिवरे आदी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी कमल देवाडिगा, माला देवाडिगा, शामिनी देवाडिगा उपस्थित होते.