दोन लाख भाविक येण्याचा अंदाज : दत्त यात्रोत्सवासाठी पोलिसांचा वाढीव बंदोबस्त कसबे, मौजे सुकेणेनगरी गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:06 AM2018-03-05T00:06:18+5:302018-03-05T00:06:18+5:30
कसबे सुकेणे : प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवानिमित्त सुकेणेनगरी भाविक व यात्रेकरूंच्या गर्दीने गजबजली आहे.
कसबे सुकेणे : येथील ग्रामदैवत भैरवनाथ-जोगेश्वरी आणि प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवानिमित्त कसबे सुकेणे व मौजे सुकेणेनगरी भाविक व यात्रेकरूंच्या गर्दीने गजबजली आहे. यात्रोत्सवात सुमारे दोन लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी यात्रास्थळ व पालखी मार्गाची पाहणी केली असून, नाशिक पोलीस मुख्यालयाकडून वाढीव पोलीस बंदोबस्त मिळाला असल्याची माहिती कसबे सुकेणे पोलिसांनी दिली.
देशभरातील महानुभाव पंथियांचे प्रमुख स्थान असलेले मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिराच्या यात्रोत्सवाला रंगपंचमीपासून प्रारंभ होत आहे. ओझर व कसबे सुकेणेचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, आय. टी. मोरे, रामदास घुमरे, ताराचंद चौवरे यांनी यात्रास्थळाची तसेच पालखी मार्गाची पाहणी करून मंदिर प्रशासनाला भाविकांच्या सुरक्षितेविषयी सूचना केल्या आहेत. मौजे सुकेणे दत्त मंदिरात यात्रा काळात होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन बारीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यात्रेत टवाळखोर, हुल्लडबाजी करणाºया युवकांवर तत्काळ कारवाई केली जाणार असून, मटका, जुगार यासारख्या अवैध धंदे यात्रा काळात आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दत्त मंदिर संस्थानचे महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर,बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांनी पोलीस अधिकाºयांचा दत्त मंदिर आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. दत्त मंदिर संस्थानकडून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. यात्रेत जिल्ह्यातील अनेक भागातील भाविक सहभागी होतात. भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन दत्त मंदिर संस्थान व मौजे सुकेणेच्या ग्रामस्थांनी केले आहे. मौजे सुकेणे ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेकरूंना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार असून, यात्रेतील व्यावसायिकांनी जागेबाबत ग्रामपंचायतीशी संपर्कसाधावा, असे आवाहन सरपंच वृषाली भंडारे, उपसरपंच नंदराम हंडोरे यांनी केले आहे. यात्रा काळात बाणेश्वर मंदिरात जुगार व मटका खेळला जातो. मौजे सुकेणेच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करीत परिसर सुशोभित केला आहे. मात्र काही टवाळखोरांकडून परिसरात जुगार व मटका खेळला जात असल्याने मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले. पोलिसांनी याबाबत लक्ष घालून छुप्या पद्धतीने होणारे अवैद्य धंदे बंद करावे, अशी मागणी मौजे सुकेणेचे माजी सरपंच सुरेश मोगल यांनी केली आहे.