कुशावर्त तीर्थात झाले भाविकांचे अखंड स्नान...
By admin | Published: September 26, 2015 10:52 PM2015-09-26T22:52:58+5:302015-09-26T22:53:33+5:30
कुशावर्त तीर्थात झाले भाविकांचे अखंड स्नान...
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील महत्त्वाची तिसरी पर्वणी आणि निर्मल आखाड्याचे दहावे शाहीस्नान पार पडल्यानंतर सकाळी ११ पासून अखंडपणे भाविकांनी कुशावर्त कुंडात स्नान करून पदरी पुण्य जोडण्याचे काम केले. रात्रभर भाविकांच्या रांगा संथगतीने कुशावर्त तीर्थाकडे वळत होत्या. उत्तररात्री काहीशी कमी झालेली गर्दी पहाटपासून पुन्हा वाढली असून, आज दिवसभर भाविकांची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे. एरवी रात्री ९, साडेनऊपर्यंत शुकशुकाट असणाऱ्या कुशावर्त कुंडावर काल रात्रभर अखंडपणे भाविकांचा स्नानासाठी राबता होता. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनाही भाविकांवर नजर ठेवण्यासाठी रात्र जागून काढावी लागली. महिरावणी, खंबाळे, अंजनेरी अशा दूर अंतरावरून पायी चालत येऊन भाविकांनी कुशावर्तात स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील भाविकांची संख्या यात लक्षणीय होती. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून संपूर्ण त्र्यंबकनगरीत जागोजागी बॅरिकेडिंग केले असल्याने व भाविक शिस्तीने रांगेतच हालचाल करू शकतील, असे नियोजन असल्यामुळे स्नानासाठी आणि मंदिरात दर्शनासाठी लागलेल्या रांगा गावाच्या चारही दिशांना लांबवर पसरल्याचे चित्र होते. काहीही न खाता-पिता तासनतास रांगेत उभे असल्याने काही भाविकांना चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे असा त्रास झाला. जागोजागी अॅम्ब्युलन्स व बुथ असल्याने तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. भाविकांची गर्दी पाहता त्र्यंबक-नाशिक रस्ता जाम झाला होता व एकही बस पुढे सरकू न शकल्याची स्थितीही बराच काळ निर्माण झाली होती. आता गर्दी आटोक्यात आली असून, त्र्यंबक-नाशिक रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)