मुदत संपूनही ६७ हजार नागरिकांनी नाही घेतला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:31+5:302021-09-02T04:32:31+5:30
नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे ...
नाशिक : भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा कहर बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. पण, काही प्रमाणात तरी रुग्णांच्या मृत्यूची प्रकरणे अजूनही सुरूच आहेत. कोविडच्या उद्रेकावर लसीकरणाचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. मात्र, अनेक नागरिकांनी पहिली लस घेतल्यानंतर कोरोना परत येणार नाही किंवा कोरोना गेल्याच्या अविर्भावात लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ केली आहे. किंवा मुदत उलटून गेल्यानंतर दुसरा डोस लवकर उपलब्ध न झाल्याचे निमित्त साधत जिल्ह्यातील ६७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेणेच टाळले असल्याचे दिसून येत आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याचे काम सुरू होते, दुसऱ्या डोसनंतर त्याला अधिक गती येते. त्यामुळे दोन्ही डोस घेणे आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिकांनी पहिल्या डोसनंतर पुढील डोस टाळल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव पूर्णपणे टाळायचा असेल तर प्रत्येकास लसीच्या दोन डोसची आवश्यकता आहे. आरोग्यतज्ज्ञदेखील वेळोवेळी यावर जोर देत आहेत की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच आपण संसर्गापासून पूर्णपणे स्वत:चा बचाव करू शकतो.
इन्फो
दुसरा डोस तितकाच आवश्यक
प्रथम डोसदेखील खूप प्रभावी आहे यात काही शंकाच नाही; पण दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोसमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार असून, तो आपल्याला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचविण्यास उपयुक्त ठरतो.
इन्फो
नेमकी अडचण काय?
ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्या लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्याबरोबरच अनेक केंद्रांवर केवळ दुसरा डोसच उपलब्ध करून नागरिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, काही वेळा वेळेवर लस उपलब्ध नसते, कुठे संपते, तर कधी दुसऱ्या डोसचा निर्धारित कालावधी उलटून गेलेला असतो. तर काही नागरिक पहिला डोसच पुरेसा असल्याच्या भ्रमात राहात असल्याने त्यांनी दुसरा डोस टाळल्याचे दिसून येत आहे.