अतिक्रमण काढल्यानंतरही काम रखडले
By admin | Published: October 18, 2016 12:43 AM2016-10-18T00:43:59+5:302016-10-18T00:45:59+5:30
जायगाव : धुळीच्या त्रासासह दळणवळणास अडथळा
जायगाव : धुळीच्या त्रासासह दळणवळणास अडथळानायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील अतिक्रमणे हटविल्यानंतरही शिंदे-पाटपिंप्री रस्त्याचे काम रखडले आहे. गावातील रस्ता मोठ्या प्रमाणात खोदून ठेवल्याने धुळीच्या त्रास आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे दळणवळणास अडथळे ठरत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
सहा महिन्यांपासून सुमारे १६ किलोमीटर रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम निर्मिती कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू आहे. अत्यंत संथ गतिने काम सुरू असल्याचा आरोप जायगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. रुंदीकरणात अनेक ठिकाणी मुरुमाऐवजी माती वापरल्याने रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढले असून, वाहने सरकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ठिकठिकाणी बनविलेले पर्यायी मार्गही कुचकामी बनल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.
महिनाभरापूर्वी जायगाव परिसरात या रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर गावातील मारुती मंदिर ते देशवंडी फाट्यापर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली. तथापि, त्यानंतर पुन्हा या रस्त्याकडे कोणीच फिरकलेले नाही. खोदकामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, दोन वाहने एकमेकांना पास होण्यात अडचणी येत आहे. अनेकदा नियंत्रण सुटून खड्ड्यांमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात वाहनचालक जखमीही होत आहे.
रस्त्याच्या लगत खोदलेले खड्डे पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे भरल्याने नव्याने येणाऱ्या प्रवाशांना रस्त्याचा नेमका अंदाज येत नाही, त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. (वार्ताहर)