चार दिवस उपचारानंतरही ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:34+5:302021-05-07T04:15:34+5:30
नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याची ...
नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये चार दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेऊन बाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाण ५५ टक्के असल्याची धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. विशेष म्हणजे बाधित रुग्ण घरात असतांना होणाऱ्या मृत्यूपेक्षा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ९७ टक्के इतके आहे.
नाशिक जिल्ह्यात सुमारे ३३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाने बाधित असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज सुमारे तीन ते चार हजारांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. अनेकांना रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत म्हणून परत पाठविले जात आहे तर काही ठिकाणी खाटा असल्या तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नसल्याचे कारण देत रुग्णांना नाकारण्यात येत आहे. जे रुग्ण दाखल आहेत, त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. प्रसंगी रेमडेसिविर, टोसी सारख्या इंजेक्शनसाठी धावपळ करून काळाबाजारात जादा दराने खरेदी करीत आहेत. साधारणत: दहा ते बारा दिवसात रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात असले तरी, आजवर झालेेल्या ३६९२ मृत्यूंची आरोग्य विभागाने कारणमीमांसा केली असता, त्यात चार दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयात उपचार घेऊनदेखील २०३० रुग्णांचा मृत्यू झाल्याचा म्हणजेच एकूण ५४.९८ टक्के मृत्यूचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाइतक्याच प्रमाणात काेरोना बाधित रुग्ण दगावले असून, संशयित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु काही रुग्णांना लक्षणे असूनही त्यांनी दुर्लक्ष करून घरच्या घरीच उपचार करण्यावर भर दिला. अशा घरातच राहून उपचार करणाऱ्या सुमारे ११५ रुग्णांचा घरीच मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण ३ टक्के इतके आहे. एक ते सलग तीन दिवस रुग्णालयात उपचार घेऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णालयात उपचार होतांना मृत्यू होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी, रुग्णांची प्रकृती गंभीर असणे व उपचाराला प्रतिसाद न देणे ही त्यामागची कारणे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
--------
उपचाराचे दिवस व मृत्यूचे प्रमाण
१) घरी मृत्यू पावलेले- ११५ (३.११)
२) एक दिवस उपचार - ७४८ (२०.२६)
३) दोन दिवस उपचार- ४३४ (११.७६)
४) तीन दिवस उपचार - ३६५ (९.८९)
५) चार दिवसानंतर उपचार - २०३० (५४.९८)