सत्तांतर होऊनही शासकीय समित्यांना लागेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 01:02 AM2021-02-16T01:02:50+5:302021-02-16T01:03:46+5:30
नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येऊन सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी होत असला तरी अद्याप शासकीय समित्या आणि महामंडळांवर ...
नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येऊन सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी होत असला तरी अद्याप शासकीय समित्या आणि महामंडळांवर अशासकीय सदस्य म्हणजेच कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने अस्वस्थता आहे. आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने तरी तातडीने नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. यासंदर्भात नाशिक शहर काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष कृष्णा नागरे यांनी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवले आहे. राज्यात सत्तांत्तरे झाली की नूतन सत्तारूढ पक्षाचे कार्यकर्त्यांना काही ना काही पदे मिळण्याची अपेक्षा असते. विशेषत: कार्यकर्त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना महामंडळे किंवा अन्य राज्य, विभाग आणि जिल्हास्तरीय समित्यांमध्ये स्थान मिळते. त्याच बरोबर अन्य कार्यकर्त्यांना अगदीच काही नसले तर किमान विशेष कार्यकारी अधिकारी पद तरी मिळते. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप अशा कोणत्याही महामंडळे किंवा समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तरी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी कृष्णा नागरे यांनी केली आहे.
राज्यात सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही समित्यांची फेररचना झालेली नाही. त्यामुळे नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी स्थिती आहे. समित्यांच्या फेररचना झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती होऊ शकेल.
- कृष्णा नागरे, माजी शहर उपाध्यक्ष कॉंग्रेस