लॉकडाऊननंतरही अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:13 AM2021-02-15T04:13:57+5:302021-02-15T04:13:57+5:30
नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात ...
नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्या धावत असून काही मार्गांवरील बसेस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. जिल्ह्याला अवघे ४९ टक्के इतके उत्पन्न मिळत असून अजूनही १० टक्के बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात ८३२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू होती. बसेस सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी सध्या मार्गावर केवळ ६६७ बसेस धावत आहेत. नाशिक शहरात महापालिकेने अजूनही बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे मनपाची सेवा सुरू नसली तरी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात केवळ ५९० बसेस सुरू केल्या आहेत. उर्वरित जवळपास ७० बसेस अजूनही बंदच आहेत. याचा फटका शहरालगतच्या गावांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.
महामंडळाचे सर्वाधिक उत्पन्न हे यात्रा स्पेशल गाड्यांमधून मिळते. परंतु यंदा त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा बंदचा फटका महामंडळाला बसला. वणी येथील बसफेऱ्यादेखील बंद करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची संख्यादेखील कमी झालेली आहे. त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे.
--इन्फो---
सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्गही बंद
नाशिक ते पुणे हा महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग आहे. मात्र प्रवासीच नसल्याने या मार्गावरील बसेसच्या संख्येत कपात करण्यात आलेली आहे. खासगी शिवशाही चालकांनी आगोदरच या मार्गावरील काही फेऱ्या बंद केलेेल्या आहेत. याशिवाय पुण्यातील आयटी पार्क अजूनही बंद असल्यामुळे त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे. त्यामुळे उत्पन्न घटले आहे.
--कोट--
महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यात शहर बसेस धावत नाहीत. त्याचा फटका शहरात दैनंदिन येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खेड्यातही बसेस नसल्याचा प्रवााशांना त्रास होत आहे.
- किसनराव क्षिरसागर, प्रवासी
--कोट--
बसफेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगार, मजुरांना सर्वाधिक फटका बसत आहे. वेळेत बस नसल्याने कामावर आणि घरी पोहोचण्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. बसेस नसल्यामुळे जादा पैसे देऊन खासगी वाहनातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
- दतू आव्हाड, प्रवासी
--इन्फो-
महामंडळाला अजूनही प्रवासी वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न केवळ ४९ टक्के इतके मिळत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यांचा मेळ बसवावा लागतो. कमी उत्पन्न झाल्याचा परिणाम महामंडळाच्या कामकाजावर नक्कीच होतो. परंतु परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. येत्या काही दिवसात आणखी परिस्थिती बदलू शकेल अशी अपेक्षा आहे.
- वरिष्ठ अधिकारी, एस.टी. महामंडळ