आठ दिवस धावूनही मिळाले केवळ दीड लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:37+5:302021-06-16T04:19:37+5:30
नाशिक : कोरेानाच्या दुसऱ्या लाटेत अडीच महिने बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्या असल्या ...
नाशिक : कोरेानाच्या दुसऱ्या लाटेत अडीच महिने बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसल्याने गेल्या आठ दिवसात नाशिक विभागाला केवळ १ लाख ६२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्हांतर्गत तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या विविध मार्गावर सुरू असतानाही महामंडळाला सरासरी दररोज २० हजार इतकेच उत्पन्न मिळत आहे.
मागील वर्षापासून केारोनामुळे एस. टी. महामंडळाचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. पहिल्या लाटेनंतर महामंडळाने गती घेतली असतांनाच दुसऱ्या लाटेच्या कोंडीत महामंडळ सापडले आणि तब्बल दोन महिने बसेस निर्बंधात अडकून पडल्या. जिल्ह्यात २४ मेपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे उत्पन्नदेखील जमेतेमच राहिले. त्यानंतर कोरेाना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नाशिकचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला आणि प्रवासी वाहतुकीला हिरवा झेंडा मिळाला.
जिल्ह्यातील बसेसला स्टँडिंग प्रवासी वगळून शंभर टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्याने पहिल्या दिवसांपासून विविध मार्गांवर सुमारे २१६ बसेस सोडण्यात आल्या. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवर तसेच धुळे, पुणे, मुंबई,औरंगाबाद येथे बसेस सोडण्यात आल्या असल्या तरी प्रवासी नसल्यामुळे पहिल्या दिवशी महामंडळाला अवघे १२ ते १५ हजार इतकेच उत्पन्न मिळाले होते. काही दिवसांनी प्रवासी एस.टी.कडे वळतील अशी अपेक्षा असल्याने नाशिक विभागाने बससेची संख्या वाढवूनही अपेक्षित प्रवासी मिळू शकलेले नाही.
सद्यस्थितीत महामंडळाच्या २५० बसेस विविध मार्गांवर सुरू असून, दररोज किमान ५२० ते ५५० इतक्या फेऱ्या करीत आहेत. असे असतानाही दररोज किमान २० हजारांच्या जवळपास उत्पन्न मिळत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये केवळ १ लाख ६२ इतकेच उत्पन्न मिळालेले आहे. यामध्ये मुंबई, पुणे तसेच धुळे मार्गावर धावणाऱ्या बसेसला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत प्रवाशांचा असलेला प्रतिसाददेखील थंड असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामंडळालादेखील उत्पन्नाची चिंता लागली आहे.
--इन्फो--
बसेसचे फेरनियोजन शक्य
सध्या जिल्हा ते तालुका तसेच तालुका ते तालुका अशा मार्गांवर बसेस सुरू करून उत्पन्न वाढीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या बसेसलादेखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या बसेसचे फेरनियोजन केले जाण्याची शक्यता आहे. आठ दिवसांतील जेमतेम उत्पन्न पाहता शहरातील काही बसेस सुरू केली जाण्याचीदेखील शक्यता आहे.