जुलै संपत आला तरीही शेती कोरडीच; अवघी ७५ टक्के पेरणी
By संदीप भालेराव | Published: July 27, 2023 01:08 PM2023-07-27T13:08:50+5:302023-07-27T13:08:57+5:30
दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुरू असल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना नाशिक जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. जुलै महिना संपत आला असताना ही जिल्ह्यातील पेरणी अवघी ७५ टक्के इतकीच झाली असल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाचा वर्षाव होत असल्याने त्यावरच पेरणी टिकून असल्याचे एकूणच चित्र आहे.
राज्यात वरुणराजाची कृपादृष्टी बरसणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणे भरली आहेत तर काही धरणांमधून विसर्ग करावा लागला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस बरसला असताना नाशिकवर मात्र पावसाची अजूनही कृपादृष्टी झालेली नाही. त्याचा फटका शेती कामांना बसला असून जिल्ह्यात केवळ ७२ टक्के इतकीच पेरणी क्षेत्र झाले आहे. अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.
जून महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने दिलेली ओढ कायम असून अधून मधून बरसणाऱ्या पाऊसधारा व्यतिरिक्त दमदार पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली आहे. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस झाला असला तरी तेथेही जेमतेम पेरणी झाल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वरला ४०.३५ तर इगतपुरीत ७१.३१ टक्के इतकी पेरणी झाली आहे. येवल्यामध्ये कापसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी १०५ टक्के इतकी कापूस लागवड झाल्याचे दिसून येते.