कोरोना वाढत असतानाही प्रवाशांची पसंती ‘शिवशाहीला’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:00+5:302021-03-30T04:11:00+5:30
नाशिक : मागील वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करावा लागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला यंदाही कोरोनामुळे काहीसा ब्रेक लागला आहे. उत्पन्न ...
नाशिक : मागील वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करावा लागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला यंदाही कोरोनामुळे काहीसा ब्रेक लागला आहे. उत्पन्न कमी होताना दिसत असले तरी बसेसमधूनच प्रवास करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शिवशाही बसेसला काेरोनाच्या काळातही चांगला प्रतिसाद लाभत असून, उन्हामुळे तर अधिक पसंती दिली जात आहे.
कोरानाच्या संकटात एस.टी. महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. त्यातून सावरत असताना पुन्हा कोरोनाचा फेरा आला. त्यामुळे महामंडळाची चाके पुन्हा थांबणार असल्याचे चित्र असताना शिवशाही बसेसमधून प्रवास करण्याला प्राधान्य देणारेदेखील प्रवासी आहेत. नाशिकहून मुंबई, पुणे, दादर, बोरिवलीकडे शिवशाही बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. वातानुकूलित बसेस असल्याने या बसेसला प्रवासी प्राधान्य देत आहेत. उन्हाळ्याचे दिवस त्यातच काेरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रवासी बाह्य संपर्क टाळण्यासाठी शिवशाहीमध्ये प्रवास करण्याला पसंती देत आहेत.
नाशिकमध्ये शिवनेरी बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याऐवजी शिवशाही बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. खासगी कंत्राटदार तसेच एस.टी. महामंडळ अशा दोहोंच्या माध्यमातून शिवशाही बसेस चालविल्या जातात. नियमित प्रवासी असलेल्या पुणे, मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणात बसेस सेाडल्या जातात.
--इन्फो--
पुणे मार्गावरील गाड्यांना कमी प्रतिसाद
नाशिक-पुणे या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. परंतु यंदा कोरेानामुळे आयटी इंडस्ट्री बंद आहे. शिवाय अनेक कंपन्या, शासकीय कार्यालयांवरील निर्बंध यामुळे प्रवाशांची संख्यादेखील कमी झाली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पुणे मार्गावर बसेसची संख्या कमी झालेली आहे.
--इन्फो--
महामंडळाचे उत्पन्न झाले कमी
कोरोनामुळे महामंडळ कसेबसे सावरत असताना उत्पन्नाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. कसेबसे ५५ टक्केपर्यंत उत्पन्न आलेले असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पन्न १५ ते २० टक्याने पुन्हा कमी झाले आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत शिवशाहीच्या उत्पन्नातदेखील घट झाल्याचे दिसून आले आहे.
--इन्फो--
मागील वर्षी लॉकडाऊननंतर जिल्हांतर्गत बसेस सुरू झालेल्या असताना पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या शिवशाही बसेस सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होताच. यावर्षी शिवशाही बसेस सुरू झाल्यानंतर खासगी कंत्राटदारांनी उत्पन्न मिळत नसल्याने बसेस चालविण्यास नकार दिला होता. त्यामुळे शिवशाही बसेस कमी धावत होत्या. या बसेसला पुणे, मुंबई मार्गावर चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत भर पडत आहे.
--बॉक्स--
जिल्ह्यातील शिवशाही बसेसच्या संख्या
५३
सध्या सुरू असलेल्या शिवशाही
२४
--इन्फो--
मुंबईला चांगला प्रतिसाद
नाशिकमधून मुंबईकडे जाणाऱ्या शिवशाही बसेसेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. नाशिकहून जाताना आणि मुंबईहून येताना प्रवासी शिवशाही बसेसेला प्राधान्य देतात. वातानुकूलित तसेच बंदिस्त गाडी असल्यामुळे प्रवाशांना शिवशाहीची सुरक्षितता वाटते. उन्हाळ्यामुळे आरामदायी प्रवासासाठी शिवशाही बसेसचे बुकिंग चांगले होते. याशिवाय थेट गाडी असल्यामुळे इतरांचा संपर्क कमी येत असल्यानेदेखील शिवशाहीला प्राधान्य मिळते. नाशिकमधून पुणे, बोरिवली, दादर अशा ठिकाणी बसेस धावतात. सद्य:स्थितीत पुण्यापेक्षा मुंबईकडे जाणारे प्रवासी आवर्जून शिवशाही बससेच्या माध्यमातून प्रवास करण्याला प्राधान्य देताना दिसतात.