एप्रिल उजाडूनही टंचाई कामांना नाही मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:05+5:302021-04-01T04:16:05+5:30

नाशिक : एप्रिल महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमान ३९ अंशांपुढे गेले असले तरी अद्याप जिल्ह्यातील ...

Even at the dawn of April, there is no shortage of work | एप्रिल उजाडूनही टंचाई कामांना नाही मुहूर्त

एप्रिल उजाडूनही टंचाई कामांना नाही मुहूर्त

Next

नाशिक : एप्रिल महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमान ३९ अंशांपुढे गेले असले तरी अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवून टँकरची मागणी झालेली नाही. परिणामी कृती आराखडादेखील कागदावरच राहिला आहे. आता उन्हाची तीव्रता वाढल्यास शेवटच्या आठवड्यात टँकरची मागणी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२०च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. तथापि, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाणी साठवणुकीची पुरेशी साधने नसल्याने या तालुक्यांमध्ये दरवर्षीच पाण्याची टंचाई भासते. त्याचबरोबर टंचाई पाचवीला पूजलेल्या बागलाण, नांदगाव, मालेगाव, देवळा या तालुक्यांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यंदा एप्रिल उजाडला तरी, अद्याप पाण्यासाठी फारशी ओरड नसली तरी, सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत नद्या, नाल्यांची पाणीपातळी कमी होऊन शेतकऱ्यांच्या विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा हंगामही संपुष्टात येत असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज जवळपास संपली आहे. मात्र, उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास महिना अखेरीस पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उन्हाळ्यात ६०४ गावे व ७१८ वाड्या अशा प्रकारे एकूण १३२२ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यावर उपाययोजनासाठी अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. टंचाई कृती आराखड्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील एकाही कामाचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कृती आराखड्याचा तिसरा टप्पा सुरु झाला असून, त्यामुळे सध्या तरी आराखडा कागदावरच राहिला आहे.

-------

संभाव्य कामे प्रस्तावित

बोरअरवेलची दुरुस्ती होणार - ८

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - १३२२

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - २४४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करणार - १४

नळयोजना पूर्ण करणार - ६५

--------

आराखड्यात होणार १४९५ कामे

टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४९५ कामे केली जाणार असून, त्यात प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळयोजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याची कामे केली जाणार असून, या उपरही पाणीटंचाईची समस्या दूर न झाल्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

-------

८६१ टॅँकरचे नियोजन

जिल्ह्यातील १३२२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून सर्व उपाययोजना राबवूनही ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत नाहीत, अशी ८६१ गावे, वाड्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे तसेच

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीत, अशा गावांमध्ये शेतकऱ्यांकडील खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यात १८५ गावे व ७५ वाड्यांमधील २६० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात विहीरमालकाला मोबदला अदा करण्यात येणार आहे.

Web Title: Even at the dawn of April, there is no shortage of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.