जनआरोग्य योजनेत समावेश केला तरी लाखाेंचा भुर्दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:09+5:302021-05-20T04:15:09+5:30
नाशिक : कोरोनासह आता म्युकर मायकोसिसच्या नवीन संकटाला तोंड देण्यासाठी या आजाराचा समावेश नुकताच राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले ...
नाशिक : कोरोनासह आता म्युकर मायकोसिसच्या नवीन संकटाला तोंड देण्यासाठी या आजाराचा समावेश नुकताच राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात आला आहे. मात्र, या आजारावरील ॲम्फोटेरेसिन किंवा ॲम्बिसोम या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. अधिकृतरित्या विविध कंपन्यांचे ५ ते ७ हजारांना मिळणारे हे इंजेक्शन सध्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना २५ ते ३० हजार रुपयांमध्ये मिळते. तसेच हे इंजेक्शन केवळ एक-दोन नव्हे तर कुणाला २० ते ४०, तर काही गंभीर रुग्णांना ७० ते ८० इंजेक्शन्सदेखील द्यावी लागतात. अशा परिस्थितीत रुग्णाला लागणारी इंजेक्शन्स रुग्णालयांनी बाहेरून आणायला सांगितल्यावर ती एकतर मिळणे मुश्कील. त्यातूनही कुठे मिळाली तर त्यांचा खर्च कैक लाखांच्या घरात जाणारा असल्याने शासनाने सर्वप्रथम या इंजेक्शन्सचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्यातील १०० टक्के जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात राहील. त्यानंतर त्याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी नमूद केले होते. कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता या दोन्ही योजनांचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
इन्फो
तत्काळ इंजेक्शन्स मिळावीत.
या केवळ योजनेचा समावेश करणे पुरेसे ठरणारे नसून त्या आजारावरील औषधे संबंधित रुग्णालयांना तातडीने आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच संबंधित रुग्णालयांनी ती त्याच रुग्णाला आणि आवश्यक त्या प्रमाणात देणे अत्यावश्यक आहे किंवा प्रशासनाकडून त्या रुग्णांच्या नावानेच थेट त्या रुग्णालयात इंजेक्शनचा साठा पोहोचल्यावर किती इंजेक्शन दिले, त्यावर रुग्णाच्या कुटुंबियांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.
इन्फो
कुटुंबीय हतबल
खासगी दवाखाने उपचारासाठी कुठे १० लाख, तर कुठे १५ लाख रुपयांच्या पॅकेजची मागणी करतात. काही ठिकाणी रुग्णांना इंजेक्शन तुम्हीच आणा, असे सांगत असल्याने ४ ते ५ लाखांचे पॅकेज सांगितले जाते. तर ज्या रुग्णालयात या योजनेचा समावेश आहे. तिथेदेखील इंजेक्शन्स बाहेरूनच आणावी लागतात. सामान्य माणसांकडे इतका पैसा नसल्याने एकतर त्यांना या इंजेक्शन्ससाठी वणवण भटकावे लागते. अन्यथा इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णाला अजून गंभीर अवस्थेत जाताना पाहण्यावाचून कुटुंबियांसमोरही मार्ग उरत नाही, हे वास्तव आहे.
कोट
ॲम्फोटेरेसिनचे इंजेक्शन संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध नाही. पूर्ण जिल्हा पालथा घालूनही त्याचा उपयोग झालेला नाही. या आजाराचा समावेश केवळ शासकीय योजनेत करून उपयोगाचे नाही. ती इंजेक्शन्स तत्काळ उपलब्ध झाल्यासच रुग्णांचा जीव वाचू शकणार आहे.
प्रदीप माठा, बाधित रुग्णाचे नातेवाईक