मजूर गावी गेल्यासही वाढणार अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:59 PM2020-05-05T22:59:04+5:302020-05-05T23:10:48+5:30
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गेल्या २३ मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन घोषित केले आहे. ते वाढतच असून आता तिसऱ्या टप्प्याचे लॉकडाउन सध्या सुरू आहे. तथापि, लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अनेक मजुरांना इच्छा असून, त्यांच्या मूळ गावी जाता आलेले नाही. कोरोनामुळे घराची चिंता लागून राहिलेल्या नागरिकांनी स्थलांतरित करण्याची मागणी सुरू आहे. लॉकडाउन काळात नाशिकमार्गे निघालेल्या राज्यातील आणि उत्तर भारतातील स्थानिक मजूर आणि स्थलांतरितांना नाशिक जिल्ह्यात निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. एकूण २७ केंद्रात १ हजार ९०१ मजूर आणि कामगारांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यातील भोपाळ येते ३३२ आणि लखनऊ येथील ८४७ कामगारांना विशेष रेल्वेद्वारे पाठविण्यात आले आहे.
आता अशाच प्रकारे शेकडो मजूर त्यांच्या मूळ गावी जाण्यास इच्छुक असून, त्यांनी शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. घराची ओढ लागलेल्या या मजुरांना आता मूळ ठिकाणी पाठविण्यासाठी शासनही राजी होत आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. तथापि, अशाप्रकारचे हजारो मजूर गावी गेल्यास मात्र, अनेक प्रकारचे उद्योग धंद्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार बांधकाम क्षेत्रात सुमारे ७० टक्के परप्रांतीय कामगार असून, ते परत गेल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जी कामे पूर्णत्वास आली आहेत, तीदेखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी लॉकडाउन आणि संचारबंदी आता मजुरांची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे.
लॉकडाउनसारख्या अडचणींमुळे महारेराने मार्चपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असलेल्या बांधकामांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु आताही अत्यावश्यक बांधकामांना विशेषत: अडकलेल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी परवानगी दिली असली तरी बांधकाम साहित्याची दुकानेच खुली नाही. त्यामुळे बांधकामे पूर्ण होण्याविषयी शंका आहे.
- अविनाश शिरोडे, विकासक, नाशिक
परप्रांतीय मजूर स्थलांतरित झाल्यास अनेक अडचणी उद््भवणार आहेत. विशेषत: आता लॉकडाउन शिथिल करून कामांना गती द्यायची असताना आता परप्रांतीय मजूर गेल्यास ते पावसाळ्यात येणार नाहीत त्यामुळे कामे सुरू होऊनदेखील ती रखडणार आहेत.
- विलास बिरारी, माजी अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन आॅफ इंडिया