माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:33+5:302021-07-20T04:11:33+5:30
शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अजूनही निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे यंदाही नवविवाहितांची माहेरची वाट बिकट आहे. यंदा कोरोनामुळे ...
शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अजूनही निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे यंदाही नवविवाहितांची माहेरची वाट बिकट आहे. यंदा कोरोनामुळे लग्नसोहळ्यावरही निर्बंध लादण्यात आले होते. मोजक्याच वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह उरकावे लागले. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितांना माहेरची ओढ लागते, ती आषाढात. विवाहानंतर आषाढातील पहिल्या पौर्णिमेला मुलींना माहेरी आणण्याची प्रथा आहे. मुलगी माहेरी आल्यानंतर तिला साडीचोळी व जावयाला भेटवस्तू देऊन आखाड साजरा केला जातो. त्यामुळे नवीनच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना माहेरी जाण्यासाठी ओढ लागलेली असते. आपल्या माहेरची माणसं तिच्या मनात रुंजी घालत असतात. मात्र, यावर्षीही कोरोना संसर्गामुळे नवविवाहितांची माहेरची वाट अडवली गेली आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी, अजूनही अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भयानकतेचेही तज्ज्ञांकडून अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे कुणीही गाफील राहू इच्छित नाही. त्यामुळेच दूरवर असलेल्या माहेरी जाण्यासाठी नवविवाहितांवर मर्यादा आल्या आहेत. सध्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सासरीही माहेरपणाचा अनुभव घेता येणे शक्य बनल्याने अनेकांनी त्याचाच आधार घेत आपल्या परंपरा राखल्या आहेत.
कोट...
माहेरी जायला कोणाला आवडणार नाही? आषाढातील पहिल्या सणाची उत्सुकता आहेच. परंतु कोरोनामुळे धोका पत्करणेही उचित नाही. जेव्हा वेळ मिळेल आणि परिस्थिती सामान्य होईल त्यावेळी नक्कीच माहेरच्या माणसांना भेटायला जाईन.
- नवविवाहिता
कोट...
आपल्या पोटची पोरं माहेरी येणार म्हटल्यावर त्याचा आनंद निराळाच असतो. परंतु बाहेर कोरोनाचाही धोका आहेच. त्यामुळे आपल्या लेकीचा जीव धोक्यात घालणार नाही. तसेही तिची फोनवरून विचारपूस होतच असते. ती माहेरी येईल तेव्हा आम्ही नक्कीच एकत्रित आनंद साजरा करू.
- नवविवाहितेची आई
कोट..
माझं नुकतंच लग्न झालं आहे. आषाढातील पहिल्या सणाला मुलीला माहेरी नेण्याची प्रथा आहे. त्यामुळे माहेराची ओढ तर आहेच. निर्बंध शिथिल होत आहेत. त्यात आणखी थोडे वातावरण निवळले तर नक्कीच माहेरी जायला आवडेल. कोरोनामुळे बाहेर प्रवास करणेही धोक्याचे आहे.
- नवविवाहिता
कोट....
आषाढातील पहिल्या पौर्णिमेला लेकीचे व जावयाचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. परंतु कोरोनामुळे अजूनही निर्बंध कायम असल्याने बाहेर पडणे अवघड बनले आहे. आपण आपल्या परंपरा तर जपल्या पाहिजेतच, परंतु अतिउत्साहही आवरला पाहिजे.
- नवविवाहितेची आई
फोटो- १९माहेर-१/२
डमी- १९ माहेर डमी
190721\19nsk_22_19072021_13.jpg~190721\19nsk_23_19072021_13.jpg
फोटो- १९माहेर-१/२~फोटो- १९माहेर-१/२