बौद्धिक क्षमता असतानाही भारतीय पेटंटचे प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:11 AM2019-10-16T01:11:33+5:302019-10-16T01:12:47+5:30
भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली.
नाशिक : भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली. पेटंटच्या माध्यमातून भारत देश जगभरातील बौद्धिक संपत्तीवर अधिकार प्राप्त करून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करू शकेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेतर्फे सावानाच्या औरगांबाद सभागृहात मंगळवारी (दि.१५) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना त्यांनी ‘देशाच्या विकासात तरुणांचे योगदान’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रवि शास्त्री, संदीप भानुसे आदी उपस्थित होते. संपत्ती निर्माण करताना आपण मुळात राष्टÑ संपत्तीचा विचारच करीत नाही. आपल्या भोवतालच्या समाजाचा विकास लक्षातच घेतला जात नाही; मात्र राष्ट्रसंपत्ती व संपन्नता हाच खरा विकास असतो. आजच्या तरुण पिढीने याच मार्गाने राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा कुलकर्णी व पंकज कुं वर यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती कोल्हे यांनी आभार मानले.
आपली ऊर्जा राष्ट्रहितासाठी खर्च व्हावी
तरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी माणसांच्या आरोग्याचा विचार करणारा, निसर्गाचा समतोल राखणारा, आपली धर्म संस्कृती जपत कलेचा आनंद घेणारा व आपल्या विकासाबरोबरच राष्ट्रहिताचा विचार करणारा माणूस आपण निर्माण करू शकलो तरच देश विकासाच्या दिशेने जाईल. मुळात आपली ऊर्जा ही राष्ट्राच्या हितासाठी व मनुष्याच्या विकासाठी खर्च व्हायला हवी, असे मत कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केले.