महापालिका रूग्णालयातदेखील रेमडेसिविरचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:25+5:302021-04-12T04:13:25+5:30
नाशिक : राज्यात जाणवत असलेल्या रेमडेसिविर इंंजेक्शनच्या टंचाईचा फटका नाशिक महापालिकेच्या रूग्णालयांनाही बसला आहे. या रूग्णालयातील या इंजेक्शन्सचा साठा ...
नाशिक : राज्यात जाणवत असलेल्या रेमडेसिविर इंंजेक्शनच्या टंचाईचा फटका नाशिक महापालिकेच्या रूग्णालयांनाही बसला आहे. या रूग्णालयातील या इंजेक्शन्सचा साठा संपल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात ही इंजेक्शन आणण्यात आली आहेत. अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित कंपन्यांशी चर्चा करून वीस हजार इंजेक्शन्सची मागणी नोंदवली असून, ती सोमवारी (दि. १२) पूर्ण होणार आहे.
नाशिक शहरात कोराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात सध्या २१ हजारांहून अधिक रूग्ण आहेत. त्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच धुळे - जळगावमधूनही मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये रूग्ण येत आहेत. त्यामुळे महापालिका आणि खासगी रूग्णालयांवरील ताण वाढत आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शन्सची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयात दाखल रूग्णांच्या नातेवाईकांना औषध दुकानांच्या बाहेर तासन् तास रांगा लावाव्या लागत आहेत.
नाशिक महापालिकेच्या बिटको रूग्णालयात सातशे तर डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात दीडशे असे साडे नऊशे रूग्ण दाखल आहेत. त्यातील पाचशे रूग्ण ऑक्सीजन आणि ऑक्सीजन बेडवर आहेत. काही रूग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे लागत आहेत. मात्र, सद्या इंजेक्शन्सचा टंचाई जाणवत असून महापालिकेला देखील त्याचा फटका बसला आहे. शनिवारी (दि.१०) देण्यापुरते इंजेक्शन जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून घेण्यात आले. त्यामुळे रविवारी साठा उपलब्ध नसला तरी आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधीत कंपन्यांकडे वीस हजार इंजेक्शन्सची मागणी नोंदवली असून हे इंजेक्शन सोमवारी (दि.१२) उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
इ्न्फो...
शहरात आणखी १६४ ऑक्सीजन बेडस
शहरात ऑक्सीजन बेडसची अपुरी संख्या लक्षात घेता महापालिकेने आणखी ७ खासगी रूग्णालयाततील १६४ ऑक्सीजन बेडस उपलब्ध करून दिले आहेत. सिडकोतील पार्थ कोविड सेंटर, मानस हॉस्पीटल, गंगापूर रोडवरील दिव्यस्पर्श तसेच मुंबई नाका येथील श्री स्वामी हॉस्पीटल तसेच पंचवटीत नामको हॉ्स्पीटल, तिडके कॉलनी येथील नवसंजीवनी हॉस्पीटल आणि अंबड येथील ज्युपीटर हॉस्पीटल याठिकाणी हे बेडस उपलब्ध असतील असे आयुक्तांनी सांगितले.