मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:36 AM2024-10-07T06:36:11+5:302024-10-07T06:38:10+5:30
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो, अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : मराठी माणसासाठी आणि भाषेसाठी लढणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. याची आठवण ठेवून ज्यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी आपण जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषेत पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पक्षाच्या नवनिर्माण यात्रेअंतर्गत उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी बैठकीसाठी आले असता राज यांनी बंद दाराआड घेतलेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.