कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

By admin | Published: October 16, 2014 09:23 PM2014-10-16T21:23:04+5:302014-10-16T21:23:04+5:30

कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

Evening away from the family 'their' | कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

कुटुंबापासून दूर राहूनही ‘त्यांची’ दिवाळी आनंदात

Next

!नाशिक : कोणी बिहारचे, कोणी गुजरातचे, कोणी पश्चिम बंगालचे, तर कोणी थेट नेपाळ, दक्षिण आफ्रिकेचे... नाना प्रांतांतली ही माणसे वर्षानुवर्षे आपल्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहतात... तरीही दिवाळीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि ते इतरांच्या चेहऱ्यावरही फुलवतात... कारण हे सारे सर्कसमधले कलावंत असतात आणि सर्कस हेच त्यांचे कुटुंब असते...
नाशिकमध्ये महिनाभरापासून मुक्कामी असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसमधील कलावंत आपल्या दिवाळीबद्दल दिलखुलासपणे सांगतात. देशभरात सध्या अवघ्या आठ मोठ्या सर्कस उरल्या असून, त्यांपैकी एक असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसमध्ये १८० माणसे काम करतात. त्यांपैकी ७०-८० जण कलावंत, तर बाकीचे कामगार आहेत. त्यात पेंटर, सुतारापासून ते आचाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. सकाळी साडेपाच वाजता या सर्वांचा दिवस सुरू होतो. सरावानंतर नाश्ता, जेवण आणि दुपारी एक ते रात्री साडेनऊ या काळात तीन खेळ... अशी या सर्वांची दिनचर्या.
सर्कस वर्षभरात साधारणत: आठ शहरे फिरते. प्रत्येक ठिकाणी एक ते दीड महिना मुक्काम असतो. प्रवास आणि तंबू उभारणीचा काळ वगळला तर जवळपास बाराही महिने सर्कस सुरू असते. कोणतेही कारण असो, सर्कस कधीच बंद राहत नाही. कारण ती बंद ठेवणे मालकासह कलावंतांनाही परवडणारे नसते. सर्कशीत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशी सर्वच जाती-धर्मांची माणसे एकत्र राहतात. बहुतांश कलावंतांना वर्षभरातून, तर कित्येकांना तीन-तीन वर्षांतून एकदाच घरी जायला मिळते. त्यामुळे सर्कस हेच त्यांचे घर होते. तेथेच त्यांचे प्रेम जुळते आणि तेथेच लग्नेही होतात.
दिवाळीत काही ठिकाणी फक्त दोनच दिवस सायंकाळचे शो बंद ठेवले जातात. अनेकदा तर सर्कस तेवढीही बंद नसते. त्यामुळे कलावंतांना खास दिवाळी साजरी वगैरे करायला वेळच मिळत नाही. सकाळच्या वेळेत मात्र जो-तो आपापल्या रीतीरिवाजाप्रमाणे हा सण साजरा करतो. सर्कशीच्या मालकाकडून त्यांना काही वाढीव पैसे, भेटवस्तू आणि मिठाई दिली जाते. दूरवर असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांकडूनही गोडधोड पाठवले जाते. सर्कशीचे तंबू कापडी असल्याने कलावंतांना फटाके मात्र फोडता येत नाहीत. प्रत्येक तंबूबाहेर आणि सर्कशीच्या प्रवेशद्वारावरही पणत्या लावल्या जातात. ज्याला वाटेल तो नवे कपडे घेतो. ज्याच्या-त्याच्या संस्कृतीनुसार पदार्थ तयार केले जातात. त्यांची चव प्रत्येकाला चाखायला मिळते...
‘सर्कशीच्या कंपाउंडच्या आत आम्हा सर्वांचा एकच धर्म असतो, तो म्हणजे कलावंताचा! त्यामुळे जात-धर्म कोणताही असो, दिवाळी सगळेच साजरी करतात’, असे इथले कलावंत अभिमानाने सांगतात. घरापासून दूर असलो, तरी त्याविषयी तक्रार नाही. कारण सर्कशीतली दिवाळी आम्हा सर्वांना अपार आनंद देऊन जाते. प्राण्यांचे खेळ बंद झाल्याने सर्कस आता फक्त कलावंतांच्या कसरतीवर सुरू आहे. पुढच्या काळात सर्कस बंद होण्याची भीती आहे. असे व्हायला नको.. कारण सर्कशीवरच आमचे पोट अवलंबून आहे’, असे काही जण पोटतिडकीने सांगतात.
‘अन्य समाजाकडून तुम्हा कलावंतांना काय अपेक्षा आहेत’, असे विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ‘बाकी काही नाही, फक्त सर्कस चालू राहायला हवी! यापलीकडे लोकांनी आमच्यासाठी काही करावे अशी अपेक्षा नाही... सुटी मिळत नसल्याचीही तक्रार नाही. कारण सर्कशीतले खेळ हाच आमचा श्वास आहे... आणि आपण श्वास घेणे कधी थांबवतो का?’
- आयुष्याची ‘सर्कस’ होऊनही त्याच सर्कशीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचे हे उद्गार किरकोळ बाबींवरून तक्रारीचा सूर आळवणाऱ्यांसाठी झणझणीत अंजनच असते!

Web Title: Evening away from the family 'their'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.