अखेर गणेशोत्सवावरील विघ्न दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:54 AM2018-09-05T00:54:15+5:302018-09-05T00:55:13+5:30
नाशिक : शहरातील गणेश मंडळांसाठी मंडपासह अन्य जाचक नियम लागू करण्यात आल्याने निर्माण झालेला कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक अखेर मंगळवारी (दि.४) महापालिकेच्या शिथिलीकरणामुळे शमला. मंडपांना गेल्या वेळेप्रमाणेच परवानग्या देण्यात येईल तसेच अग्निशामक दलाचे शुल्क माफ करण्यासह विविध मागण्या महापालिकेने मान्य केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अर्थात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना मध्यस्थी करावी लागली.
नाशिक : शहरातील गणेश मंडळांसाठी मंडपासह अन्य जाचक नियम लागू करण्यात आल्याने निर्माण झालेला कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक अखेर मंगळवारी (दि.४) महापालिकेच्या शिथिलीकरणामुळे शमला. मंडपांना गेल्या वेळेप्रमाणेच परवानग्या देण्यात येईल तसेच अग्निशामक दलाचे शुल्क माफ करण्यासह विविध मागण्या महापालिकेने मान्य केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अर्थात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना मध्यस्थी करावी लागली.
येत्या १३ सप्टेंबरपासून शहरात गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून, त्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. मात्र महापालिकेच्या वतीने मंडप धोरण आणि उत्सव नियमावली अत्यंत कठीण असून त्यामुळेच मंडळांना गणेशोत्सव साजरा करणे कठीण झाले होते. विशेषत: एकूण रस्ता रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्याच्या नियमामुळे अनेक मंडळांना दरवर्षीच्या आकाराइतकेदेखील मंडप उभारता येत नव्हते तसेच नव्यानेच अग्निशमन करासह अन्य अनेक प्रकारचे नियम लागू झाले होते. सोमवारी (दि.३) नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली असता त्यांनी नियमावली शिथिल करण्यास नकार दिल्याने मंडळाचे पदाधिकारी संतप्त झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. तसेच बुधवारी (दि. ५) महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु मंगळवारी (दि.४) पुन्हा मंडळाचे पदाधिकारी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी यासंदर्भात मुख्य लेखापरीक्षक सुहास शिंदे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार झालेल्या बैठकीस आमदार देवयानी फरांदे, महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, राष्टÑवादीचे नेते गजानन शेलार, कार्याध्यक्ष पद्माकर पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार यापूर्वी ज्या पद्धतीने मंडप घातले जात होते त्याच पद्धतीने यंदाही मंडपांचा आकार कायम राहील. एक खिडकी योजनेअंतर्गत अग्निशमन दल आणि बांधकाम विभागाचे दाखले विनामूल्य देण्यात येतील. जाहिरातींच्या कराबाबतदेखील सालाबादप्रमाणे कर आकारला जाणार नाही, असे स्पष्टीकरण मिळाल्यामुळे हा वाद मिटला. त्यामुळे बुधवारी (दि. ५) महापालिकेच्या मुख्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा आणि आंदोलन रद्द करण्यात येणार आहे.
या बैठकीस कार्याध्यक्ष पद्माकर पाटील, रामसिंग बावरी, बबलूसिंग बावरी, रमेश कडलग, देवांग जानी, सत्यम खंडाळे, गणेश बर्वे, दिनेश चव्हाण, सचिन डोंगरे, लक्ष्मण धोत्रे, दिनेश कमोद, बबलू शेलार, बबलू परदेशी, कैलास मुदलीयार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील गणेश मंडळाच्या अडचणी चर्चेनंतर दूर झाल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक उत्साहात गणेशोत्सव साजरा होईल ही अपेक्षा आहे. मागण्या मान्य झाल्याने बुधवारी (दि.५) होणारे आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
- समीर शेटे,
अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळमहापालिकेचे स्पष्टीकरणगणेशोत्सवासाठी मंडळाच्या परवानगीसाठी अग्निशमन दलाचा पाहणी अहवाल आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारे फी आकारण्याची गरज नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत निरीक्षकांचा दाखला असण्याची आवश्यकता नाही. मनपाच्या बांधकाम विभागाकडील स्थळ निरीक्षण अहवाल आवश्यक आहे. तो विभागीय कार्यालयात उपलब्ध होईल. एक खिडकी योजनेअंतर्गत अग्निशमन व बांधकाम दाखल्याची सोय.अडचण असल्यास विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्तांशी चर्चा केली. मी पालकमंत्र्यांकडे समस्या मांडली होती. अखेरीस हा विषय मार्गी लागला आहे.
- आमदार देवयानी फरांदेमहापालिकेच्या वतीने जाचक नियमावली तयार करण्यात आली होती, परंतु गणेश मंडळांच्या संघटितशक्तीमुळे अनेक नियम शिथिल झाले आहेत.
- गजानन शेलार,
राष्टÑवादी गटनेता