अखेर ‘कालिदास’च्या जाचक  नियमावलीत बदल होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:06 AM2019-08-27T01:06:03+5:302019-08-27T01:07:07+5:30

नाशिक : महापालिकेच्या महाकवी कालिदास कलांमदिरात एखादा नाट्यप्रयोग रद्द झाल्यानंतर पूर्वी भाड्यात कपात केली जात असे. मात्र कालिदास स्मार्ट ...

 Eventually 'Kalidas' quest rules will change! | अखेर ‘कालिदास’च्या जाचक  नियमावलीत बदल होणार !

अखेर ‘कालिदास’च्या जाचक  नियमावलीत बदल होणार !

Next

नाशिक : महापालिकेच्या महाकवी कालिदास कलांमदिरात एखादा नाट्यप्रयोग रद्द झाल्यानंतर पूर्वी भाड्यात कपात केली जात असे. मात्र कालिदास स्मार्ट केल्यानंतर नियमावली बदलल्याने भाड्याबरोबरच अनामत जप्त केली जाते. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी यासंदर्भात संताप व्यक्त केले आणि ‘लोकमत’ने मालिकेद्वारे नियमावलीतील जाचकता पुढे आणल्यानंतर आता महापालिकेने लवचिक भूमिका घेतली आहे. येत्या महासभेत यासंदर्भात नियमावली मांडून त्यात दुरुस्ती केली जाणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी सोमवारी (दि.२६) ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
नाशिक महापालिकेच्या गेल्यावर्षी कालिदास कलामंदिराचे स्मार्ट सिटी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले. त्याचवेळी आधीची नियमावली बदलण्यात आली असून त्यात अनेक जाचक नियम ठेवण्यात आले आहे. मुख्य म्हणजे यापूर्वी कालिदास कलामंदिर बुक करून नंतर एखादे नाटक रद्द करावे लागले तर त्या नाटकाच्या भाड्यापोटी काही प्रमाणात रक्कम कापली जात असे. आता मात्र भाड्याची रक्कम आणि अनामत रक्कम दोन्ही जप्त केली जात असल्याने नाट्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यावरून ओरड सुरू असून गेल्याच महिन्यात स्थानिक नाट्य परिषद शाखा तसेच अन्य कलावंतांनी तसेच व्यावसायिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीच सुधारणा झाली नाही. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या ‘दहा बाय दहा’ या नाटकाचा १० जुलैस ठाण्याला, तर १२ जुलैस प्रयोग होता. परंतु पाठारे या आजारी पडल्याने हे रद्द करावे लागले. ठाण्याच्या रंगायतनमध्ये प्रयोग रद्द झाल्यानंतर नियमानुसार काही प्रमाणात भाड्याची कपात करण्यात आली, तर नाशिकमध्ये भाडे आणि अनामत रक्कम दोन्ही जप्त झाल्याने पाठारे संतप्त झाल्या. इतके उरफाटे नियम महाराष्टÑात कोठेही नसल्याची त्यांनी टीका केली. अभिनेते विजय पाटकर यांनीदेखील त्यांचे समर्थन केले.
याप्रकारानंतर महापौर रंजना भानसी यांनी आता कालिदास कलामंदिराची नियमावली महासभेवर सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून, त्यात अशा जाचक नियमावलीत सुधारणा करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मनमानी नियमांमुळे कलावंत त्रस्त
नाशिकच्या कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेविषयी अगोदर प्रशांत दामले, भरत जाधव, प्रसाद कांबळे यांच्यासारख्या मान्यवरांनी आवाज उठवला होता. त्यानंतर आता त्यात सुधारणा झाली असली तरी नूतनीकरण झाल्याच्या नावाखाली अव्वाच्या सवा भाडेवाढ तसेच मनमानी नियमांमुळे स्थानिक आणि बाहेरील कलावंत त्रस्त आहेत. दामले यांनी तर नाशिकमध्ये नाटकच होऊ शकत नाही इतकी भयंकर भाडेवाढ असल्याचे यापूर्वी सांगितले होते, तर गेल्या शनिवारी (दि.१७) त्यांचे नाटक असताना त्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेटही घेऊन नाराजी व्यक्त केली होती.

Web Title:  Eventually 'Kalidas' quest rules will change!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.