अखेर भरधाव वाहनांना लागला ब्रेक
By admin | Published: September 10, 2014 10:20 PM2014-09-10T22:20:23+5:302014-09-11T00:31:52+5:30
दखल : निमोण चौफुलीवर गतिरोधकदर्शक फलक
गिरीश जोशी
मनमाड
मनमाड - चांदवड रोडवर नेहमी वर्दळ असणाऱ्या निमोण चौफुलीवर गतिरोधक बसविण्यात आले असले तरी, गतिरोधक दर्शवणारे फलक नसल्याने भरधाव वेगातील वाहनांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात होत असत. याबाबत लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या ठिकाणी गतिरोधकदर्शक फलक बसविल्याने भरधाव वाहनांना ब्रेक लागला आहे.
मनमाड - चांदवड महामार्गावर निमोण चौफुलीजवळ महाविद्यालयाजवळ रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी एसटी महामंडळाची भरधाव वेगात आलेली बस या गतिरोधकावरून आदळत गेल्याने बसच्या टपावर ठेवलेले टायर उदळून रस्त्यावर कोसळले. या चौफुलीवर महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच दरेगाव डोणगावकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सुदैवाने ही स्टेपनी खाली आदळली त्या वेळी कुठलेही दुचाकी वाहन किंवा पादचारी रस्त्याने जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या रस्त्यावर गतिरोधक असले तरी गतिरोधक दर्शक फलक लावण्यात आलेले नसल्याने भरधाव वेगातील वाहनचालकांना अंदाज येत नाही. गाडी अगदी गतिरोधकाजवळ आल्यानंतर गतिरोधक असल्याचे लक्षात येत असल्याने गाडीवर नियंत्रण करणे अशक्य होते. परिणामी भरधाव वेगात गाडी जात असल्याने लहान -मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण होत असे. या ठिकाणी फलक बसविण्यात यावे ही या भागातील रहिवाशांची मागणी होती. बसवरून स्टेपनी खाली आदळून झालेला अपघात गतिरोधकदर्शक फलक नसल्यामुळे झाला होता. याबाबत लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या रस्त्यावर गतिरोधकाच्या दोन्ही दिशेला मनमाड व चांदवडकडे गतिरोधक दर्शक फलक लावण्यात आले आहे.