एव्हरेस्ट सर करणा-या हिलीमची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 03:51 PM2019-06-12T15:51:55+5:302019-06-12T15:52:09+5:30
वेळुंजे : एव्हरेस्ट शिखर सर करणा-या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील मनोहर हिलीम याची ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत जंगी ...
वेळुंजे : एव्हरेस्ट शिखर सर करणा-या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील मनोहर हिलीम याची ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत जंगी सत्कार केला. यावेळी हिलीम याचा गौरव करत ग्रामस्थांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
जिद्द, चिकाटी, मेहनत,धैर्य आणि डोळ्यापुढे ध्येय ठेवून मनोहर हिलीम याने माउंट एव्हरेस्ट शिखर मोहीम अंतर्गत मिशन शौर्यला गवसणी घातली होती. त्याच्या जिद्दीला सलाम करत एव्हरेस्ट शिखर पार केल्याने खरवळ ग्रामपंचायती तर्फे तसेच ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून हिलीम याचे वाजत गाजत स्वागत आणि सत्कार केला.या सत्काराला उत्तर देतांना मनोहर हिलीम याने प्रत्यक्ष आलेले प्रसंग कथन केले. माझ्या अंगी जिद्द, चिकाटी आणि लहान -थोरांचे आशीर्वाद तसेच गुरु जनांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरल्याचे यावेळी त्याने सांगितले. यावेळी समाधान बोडके,विनायक माळेकर यांनी यांनीही त्याचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच मंदाताई मौळे, उपसरपंच गोकुळ गारे, समाधान बोडके, विनायक माळेकर, संजय मेढे, शरद मेढे, विठ्ठल मौळे, गोपाळ हिलीम, भागवत हिलीम, सुभाष चौधरी, देविदास हिलीम, चंदर शेवरे, हरी शेवरे, दत्तू मौळे, श्याम मौळे, चंदर गावित,परशराम मौळे,वाळू दिवे,शंकर गावित,अंबादास गायकवाड,किसन शेवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्थ अभिमान
एव्हरेस्ट वीर मनोहर हिलीम याने खरवळ गावच्या नावासह तालुक्याचे,जिल्ह्याचे आणि राज्याचेही नाव मोठे केल्याने आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. इतरांनीही मनोहरचा आदर्श घ्यावा.
- मंदा विठ्ठल मौळे, सरपंच,खरवळ ग्रामपंचायत