एमटीडीसी शोधणार प्रत्येक गावाच्या प्रथा, परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:45 PM2018-09-25T23:45:48+5:302018-09-26T00:10:13+5:30
प्रत्येक गावाची स्वतंत्र ओळख असते. अशा गावांचा इतिहास, वारसा, प्रथा व परंपरा वेगवेगळ्या असतात, नेमका त्याचाच शोध घेऊन गावपातळीवर पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून, त्यासाठी प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक, इतिहासकार, जाणकारांना बरोबर घेऊन शिवार फेरी काढण्यात येणार आहे. या शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा इतिहास जाणून घेण्यात येणार आहे.
नाशिक : प्रत्येक गावाची स्वतंत्र ओळख असते. अशा गावांचा इतिहास, वारसा, प्रथा व परंपरा वेगवेगळ्या असतात, नेमका त्याचाच शोध घेऊन गावपातळीवर पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने घेतला असून, त्यासाठी प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक, इतिहासकार, जाणकारांना बरोबर घेऊन शिवार फेरी काढण्यात येणार आहे. या शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा इतिहास जाणून घेण्यात येणार आहे. देश व राज्याची स्वतंत्र ओळख असून, त्यातील प्रत्येक गावाचा एक वेगळा इतिहास आणि त्यात दडलेला वारसा आपल्याला अनुभवायला मिळतो. या इतिहासाला पर्यटनाची जोड दिल्यास इतिहासाबद्दल आवड, वारसा जतन करण्यासाठी जनजागृती आणि पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास असा तिहेरी उद्देश एकाच उपक्रमातून साध्य करणे शक्य आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गावागावातून शिवार फेरी काढून ग्रामीण भागात नेमके काय दडले आहे हे या शिवार फेरीतून नोंदविले व उलगडले जाणार आहे. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून करण्यात आली असून, नाशिकची शक्तीस्थळे ओळखून त्या गावांपर्यंत पर्यटकांना नेण्याचा प्रयत्न महाराष्टÑ पर्यटन महामंडळ करणार असल्याची माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी दिली. शिवार फेरी हा ग्रामीण भागातील पर्यटन संधी शोधणे व प्रत्येक गावात कोणत्या स्वरूपाचा वारसा, प्रथा, परंपरा आहेत हे शोधण्याचे काम करणार आहे. निफाड तालुक्यातील १३४ गावांमधून शिवार फेरी होणार असून, यात नाशिकच्या इतिहासाचे अभ्यासक रमेश पडवळ, नाणे अभ्यासक चेतन राजापूरकर यांच्या मदतीने एमटीडीसी निफाड तालुक्यातील गावागावातील वारसा समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या शिवार फेरीची सुरुवात चेहेडी खुर्द या ऐतिहासिक गावापासून झाली. त्यावेळी शिवार फेरीत गावातील मंदिरे, इतिहास ग्रामस्थांकडून जाणून घेण्यात आला. त्यानंतर गोदाकाठावरून पुरामुळे विस्थापित झालेले वºहेदारणा गावाविषयी जाणून घेण्यात आले. लालपाडी या गावातील मंदिरे, गोदाकाठ, बोहाडा परंपरा या विषयीची माहिती जाणून घेण्यात आली. लालपाडीवरून शिवार फेरी दारणा सांगवी येथे गेली. तेथील प्राचीन मंदिरे, गावातील वाडे, प्रथेची गावकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
निफाडच्या इतिहासाचे होणार संकलन
निफाड तालुक्यातील प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा, उत्सव, इतिहास, वेगळेपणाची नोंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून, यासाठी काम करणाºया अभ्यासकांना एमटीडीसीकडून सहकार्य केले जाणार आहे. शिवार फेरीच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुस्तकरूपात येणार असल्यामुळे निफाडमधील गावांनी आपल्या गावाविषयी तसेच वारसाविषयी नोंदी ८३८००९८१०७ या क्रमांकावर संपर्क साधून द्यावी, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांनी केले आहे.