प्रत्येकाने शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे : बिशप लुर्ड्स डॅनिएल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:54 AM2018-12-25T00:54:59+5:302018-12-25T00:56:18+5:30
शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही.
नाशिकरोड : शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही. जगभरातील प्रत्येक नागरिकाने युद्ध सोडून शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे, असा संदेश नाताळ सणानिमित्त नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे मुख्य बिशप लुर्ड्स डॅनिएल यांनी दिला. नाताळ सणानिमित्त सोमवारी रात्री १० वाजता जेलरोड येथील संत अण्णा महामंदिरामध्ये उपस्थिताना संदेश देताना मुख्य बिशप लुडर््स डॅनिएल म्हणाले की, आजच्या अशांत व युध्दखोर जगात प्रभू येशूचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने शांतीदूताच्या भूमिकेत कार्य केल्यास जगात शांती निर्माण होईल. मृत्यूप्रसंगी प्रभू येशू म्हणाले होते, स्वर्गीय पित्या मला ठार मारणाऱ्या माझ्या बांधवांना क्षमा कर. कारण ते काय करत आहेत, याची त्यांना जाणीव नाही. प्रभू येशूंनी मृत्यूप्रसंगीसुद्धा आपली दयाबुद्धी दाखविली होती. अशीच दयाबुद्धी सर्वांनी बाळगावी,असे प्रतिपादन मुख्य बिशप लुर्ड्स डॅनिएल यांनी केले. नाताळ सणानिमित्त सोमवारी मध्यरात्री जेलरोड संत अण्णा महामंदिर, मुक्तिधाम समोरील सेंट फिलीप चर्च, नाशिक-पुणे महामार्गावरील बाळ येशू देवालय या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूच्या जन्माची सामूहिक प्रार्थना म्हटली. ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रभू येशूच्या जन्माचा देखावा
नाताळ सणानिमित्त चर्चला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच आकाशकंदील लावण्यात आला होता. चर्चच्या परिसरात प्रभू येशूच्या जन्माचा गव्हाणीचा देखावा साकारला होता.