भाजी मंडईपासून आरोग्य केंद्रापर्यंत सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:59 PM2020-03-26T21:59:53+5:302020-03-26T23:02:48+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन्य नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन्य नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना किमान दीड ते दोन फूट अंतरावरूनच व्यवहार करावे लागत आहेत.
कोरोना संसर्ग न होण्यासाठी बाधीत व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. हस्तांदोलन टाळण्यापासूनच दोन ते तीन फूट अंतरावर राहूनच बोलणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. महापालिकेने संचारबंदी काळात शहरातील ४७ ठिकाणी भाजीबाजाराच्या जागा निश्चित केल्या असून, त्याठिकाणी येणाऱ्या नागरिक आणि विक्रेते यांच्यात अंतर रहावे यासाठी खास रेषांची आखणीच करून दिली आहे. येणारे ग्राहक त्या रेषेच्या अलीकडूनच व्यवहार करीत आहेत. याशिवाय विक्रेतेदेखील मास्क लावत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिकांनी याबाबत दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे वैद्यकीय व्यावसायिक त्याचे पालन करीत असून, नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेमध्ये प्रामुख्याने किराणा आणि औषधांच्या दुकानांचा समावेश आहे. या व्यावसायिकांनीदेखील सोशल डिन्सन पाळण्यासाठी खडूने रेषा मारून अंतर राखले जात आहे. महपाालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात ज्यांना अत्यावश्यक सेवेतील दुकान सुरू करायचे असेल त्यांना अशाप्रकारे रेषा आखण्याची सक्तीच केली असून त्यामुळे संबंधीत व्यवसायिक देखील त्याबाबत दक्षता घेत आहेत.