देवळाली गावातील अंगलो उर्दू हायस्कूलमध्ये दीड तास ईव्हीएम बंद
By Sandeep.bhalerao | Published: May 20, 2024 09:05 AM2024-05-20T09:05:55+5:302024-05-20T09:08:19+5:30
सुमारे दीड ते पावणे दोन तास मतदार ताटकळले.
नाशिक (संदीप भालेराव) : देवळाली गाव येथे अँग्लो उर्दू हायस्कूल मधील खोली क्रमांक 6 येथील मतदान यंत्र बिघडल्याने सुमारे दीड तास उशिराने मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. राखीव ईव्हीएम देखील बंद झाल्याने नवीन यंत्रे मागविण्याची वेळ आल्याने मतदानाचा सुरुवातीचा दीड तास वाया गेला.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील देवळाली विधानसभा मधील देवळाली गावात अंगलो उर्दू हायस्कूल मधील मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा गोंधळ दिसून आला. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडणी करण्यात वेळ गेलाच शिवाय यंत्र देखील सुरू झाली नाही. यंत्रे सुरू करण्यासाठी अर्धा तास खाटाटोप करण्यात आला. त्यानंतर नवीन यंत्र येऊ पर्यंत पुन्हा अर्धा तास वाट पाहावी लागली. त्यानंतर पुन्हा तपासणी, मॉक पोल आणि सिलिंग यासाठी वेळ गेल्याने सुमारे दीड ते पावणे दोन तास मतदार ताटकळले.
यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदानासाठी रंगा वाढत गेल्या असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदार केंद्रावर हरकत घेत मतदारांची एन्ट्री चुकीची असल्याचे सांगत गोंधळात अधिकच भर घातली. मतदान केंद्र अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात इंट्री कुठून असावी यावर खल चालला. अगोदरच मतदान यंत्रातील बिघाड आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने घेतलेला आक्षेप यामुळे मतदार अधिकच ताटकळले. अखेर मतदार उभे असलेल्या दरवाजातूनच एंट्री देण्यास पोलिसांनी मान्यता दिल्याने मतदारांनी सुस्कारा सोडला.