माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:37 AM2018-09-27T00:37:17+5:302018-09-27T00:38:51+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़
नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी तिची खिल्ली उडवित ‘तुला कशाला हवे घर, भीक मागून खा’ असा सल्ला देत असल्याचे निवेदन दिवंगत माजी सैनिकाची पत्नी कमल दगडू गुरव (रा़ आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी) यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना दिले आहे़ मूळ साताºयाच्या मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात सैनिक असलेले दगडू पिलू गुरव यांच्याशी कमल गुरव यांचा विवाह झाला़ आर्टिलरी सेंटरकडून पती सैन्यात असल्याची कागदपत्रेही गुरव यांच्याकडे होती़ अपत्य नसलेल्या तसेच निराधार कमल गुरव यांनी झुणका-भाकर केंद्र तसेच छोटी-मोठी कामे करून आतापर्यंत कसाबसा आपला उदरनिर्वाह केला़ जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्या कार्यकाळात लोकशाही दिनामध्ये माजी सैनिक पत्नी कमल गुरव यांना घरकुल मंजूर केल्याचे त्या सांगतात़ त्यासाठी सर्व कागदपत्रेही त्यांनी महापालिकेला दिली. त्यांना चुंचाळे, हिरावाडी येथे घरकुल देतो असे सांगण्यात आले़ मात्र कागदपत्रेच गहाळ झाली की केली? त्यांना अखेरपर्यंत घरकुल मिळालेच नाही़ कागदपत्रे गहाळ झाली असे सांगितले जाते. त्यांच्या पतीचे सर्व्हिस बुकही हिसकावून घेतल्याचे त्या सांगतात़ अनेक वर्षांपासून त्या घरकुलासाठी महापालिकेचे सातपूर विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन या ठिकाणी खेटा मारत आहेत़ विशेष म्हणजे काही रिक्षाचालक गुरव यांच्या वृद्धत्वाकडे पाहून रिक्षाचे भाडेही घेत नाहीत़ सध्या चाळीस वर्षांपासून कमल गुरव या सातपूर कॉलनीतील भाजी मंडईत उघड्यावर राहात आहेत़ घरकुलासाठी दिलेली व गहाळ केलेली कागदपत्रे शोधून घरकुल मिळावे, असे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे.
घर विकून खाऊ
स्वातंत्र्यपूर्व काळातील शहीद सैनिकाची पत्नी असून, निराधार असल्याने घरकुलासाठीची सर्व कागदपत्रे दिली आहेत़ मात्र, महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील तत्कालीन व विद्यमान अधिकारी आव्हाड, गवळी, राऊत, बच्छाव हे घरकुलाची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर ‘गाडगे महाराज मठात जाऊन राहा, तुला घर मिळणार नाही, तुझे घर आम्ही विकून खाऊ’ असे सांगतात़ महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही मी निवेदन दिले आहे़ त्यांनी तरी माझी दखल घ्यावी़ - कमल गुरव, माजी सैनिक पत्नी, आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी