माजी सैनिकांना अखेरीस घरपट्टी माफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:01+5:302021-05-23T04:14:01+5:30
देशात आणि राज्यातही काही महापालिकांनी माजी सैनिकांच्या मिळकतींना कर माफ केले आहेत. त्यानुसार नाशिकमधील माजी सैनिकांच्या संघटनांनी वेळोवेळी अशाप्रकारची ...
देशात आणि राज्यातही काही महापालिकांनी माजी सैनिकांच्या मिळकतींना कर माफ केले आहेत. त्यानुसार नाशिकमधील माजी सैनिकांच्या संघटनांनी वेळोवेळी अशाप्रकारची सवलत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. काही नगरसेवकांनी देखील त्यांना साथ दिली होती. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीने अशाप्रकारच्या सवलतीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना लागू केली असून त्या आधारे महापालिकेला करमाफीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेने मिळकत करात सूट देण्याच निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी माजी सैनिक हा मुळात महाराष्ट्रात जन्मलेला असावा किंवा १५ वर्षे महाराष्ट्रात रहिवासी असावा,तसे अधिवास प्रमाणपत्र त्याने सादर केलेले असावे, योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून तसेच प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. केवळ एकाच घरासाठीही सवलत लागु राहणार असून तसे घोषणापत्र सैनिकी कल्याण अधिकाऱ्यांना सादर करावे लागेल. माजी सैनिक हयात असे पर्यंत अथवा त्याची पत्नी/ विधवा, माजी सैनिक अविवाहीत असेल तर त्याचे आई वडील हयात असे पर्यंतच हे आदेश लागू राहातील. लाभ घेण्यासाठी दर तीन वर्षांनी महापालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. ही मिळकत भाड्याने दिली असल्यास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इन्फो...
थकबाकीदारांना सवलत नाही
योजने लाभ यापूर्वीची थकबाकी असेल तर मिळणार नाही असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे. याशिवाय अर्ज केल्यानंतर महापालिकेचे भाग निरीक्षक प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी करतील आणि त्यानंतरच स्थळ पंचनामा करून ते अहवाल सादर करतील त्यानंतरच योजना लागू होऊ शकेल.
इन्फो..
शासकीय कर भरावे लागतील
महापालिकेच्या घरपट्टीतील सरकारी, शिक्षण कर, निवासी कर, वृक्ष संवर्धन कर यांना मात्र ही सवलत अनुज्ञेय नाही. घरपट्टी माफ झाली तरी माजी सैनिकांना ही रक्कम वगळून घरपट्टी माफ करण्यात आल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.