१४०० आदिवासी विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:23 AM2020-08-03T01:23:40+5:302020-08-03T01:24:10+5:30
कोरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून, शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, शिक्षक फोनद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी करत आहेत.
नाशिक : कोरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून, शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, शिक्षक फोनद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधून याबाबत चौकशी करत आहेत. नाशिक विभागातील २२० शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवसभरातून तब्बल १५००हून अधिक फोन करून याबाबत माहिती घेतली जात आहे. या मोहिमेद्वारे मागील दोन महिन्यांत विभागाने विभागातील १४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या सोयी-सुविधा मिळतात त्या त्यांना घरीही मिळाव्यात यादृष्टीने विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने गावनिहाय नियोजन केले असून, एका दिवसात एका गावात जाऊन तेथील सर्व विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते. याशिवाय फिरती आरोग्य पथक गावात जाऊन विद्यार्थ्यंाची तपासणी करते. यामुळे कोरोनासारख्या संकटसमयीही आदिवासी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सेवा मिळत आहेत.
घरातल्यांची चौकशी
नाशिक विभागातील २२० शाळांमधील १४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना काही आजार आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन महिन्यांच्या काळात ५ ते ६ कोरोना संशयितही आढळून आले असून, त्यांची त्वरित कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. गावागावात जाऊन तपासणी करण्याबरोबरच ज्यांच्याकडे फोनची सुविधा उपलब्ध आहे त्यांना फोन करून घरातील व्यक्तींच्या आरोग्याचीही चौकशी केली जात आहे.