एलएलबी द्वितीय वर्ष पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ, २४ ऑक्टोबरपासून परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:27 PM2018-10-20T15:27:36+5:302018-10-20T15:31:35+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखा पदवी अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी २०१४ च्या जुन्या अभ्यासक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ मध्ये पुनर्परीक्षा देत आहेत. त्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र महाविद्यालयातून प्राप्त करणे अनिवार्य आहे. परंतु नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातून एलएलबी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा देणाºया २०५ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून महाविद्यालयाला प्राप्त झालेले नसल्याने विद्यार्थ्यांनाही ते मिळू शकलेले नाही. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाक डून महाविद्यालयांच्या मेल आयडीवर पाठविले जातात. या प्रवेशपत्रांचे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. परंतु महाविद्यालयाला विद्यापीठाकडूनच ओळखपत्र पाप्त झाले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर जवळपास ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही १५ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळण्याची प्रतीक्षा कायम असून, या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राअभावी परीक्षा देता आली नाही, तर त्यांचे वर्ष पुन्हा एकदा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
विद्यार्थी संघटना आक्रमक
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधी शाखेच्या द्वितीय वर्ष पदवी पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ घातल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत असतानाही अद्याप विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांचा घोळ मिटलेला नाही. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाचे अधिकारी योगेश सोनार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
प्रवेशपत्रांच्या वाटपात विद्यापीठाच्या यंत्रणेकडूनच त्रुटी राहिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
- तुषार जाधव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नाशिक