वन सेवेत थेट दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची वनखात्यांतर्गत 'परीक्षा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 07:56 PM2021-01-10T19:56:01+5:302021-01-10T20:04:32+5:30
कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही परीक्षा विभागनिहाय घेण्यात आली.
नाशिक : वन खात्यात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (आयएफएस) व राज्य लोकसेवा आयोगामार्फत थेट सेवेत दाखल झालेले उपवनसंरक्षक ते वनक्षेत्रपाल (आरएफओ) दर्जाच्या अधिकाऱ्यांना वनखात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होणे पुढील पदोन्नती व वेतनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. नाशिक विभागातून वनविभागाच्या ६६ अधिकारी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. रविवारी (दि.१०) परीक्षेचा समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका अधिकारी वर्गाने सोडविल्या.
दरवर्षी राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे नियोजन यंदा वनविभागाकडून करण्यात आले होते. मात्र, परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती व उत्तरपत्रिका या आयोगाकडे पाठविल्या जाणार आहे, तसेच ही 'इन कॅमेरा' पार पडल्याने त्याचे संपूर्ण रेकॉर्डिंगही आयोगाकडेच सादर केले जाणार असल्याची माहिती नाशिक वनविभागाच्या सूत्रांनी दिली. 'जमीन महसूल व गुन्हेगारी कायदे', 'वन कायदे' आणि राज्य वन मार्गदर्शिका नियमावलीवर अधारित प्रोसिजर व अकाउंट या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांनी निर्धारित प्रत्येकी एक तासात सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विषयाचा पेपर १५० गुणांचा होता. यापैकी उत्तीर्ण होण्यासाठी किमान ७५ गुण गरजेचे आहे.
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधील जे थेट सेवेतून दाखल झालेले अधिकारी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत वनखात्यांतर्गत ही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, असे ६६ अधिकारी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. नाशिकप्रमाणे प्रत्येक विभागनिहाय ही परीक्षा घेण्यात आली.
कोविडमुळे गेल्या वर्षी हुकली 'परीक्षा'
कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही परीक्षा विभागनिहाय घेण्यात आली. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल पुढील दोन ते तीन महिन्यांत लागणे अपेक्षित आहे. अत्यंत अवघड व किचकट स्वरूपाची प्रश्नपत्रिका असलेली ही परीक्षा पुस्तकासह घेतली जाते. म्हणजेच विषयाशी निगडित पुस्तक प्रश्नपत्रिका सोडविताना वापरण्याची मुभा परिक्षार्थ्यांना दिली जाते.
---
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत, थेट सेवेतून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून वन खात्यात रुजू झाली आहे. निकषानुसार वनखात्यांतर्गत मी ही परीक्षा दिली. पुस्तकासह ही परीक्षा असली, तरीही तीनही विषयांच्या प्रश्नपत्रिका या अत्यंत अवघड होत्या. दीर्घोत्तरी वर्णनात्मक लेखी स्वरूपात प्रश्नपत्रिका सोडविण्याचे मोठे आव्हान होते. तीन तासांचा वेळही यासाठी कमी पडला.
- सीमा मुसळे, परीक्षार्थी, आरएफओ, पेठ