रखडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमच्या परीक्षा १० जूनपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 04:00 PM2021-06-08T16:00:18+5:302021-06-08T16:04:33+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते ३० जूनदरम्यान घेतल्या जाणार आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा २३ मार्चपासून रखडल्या होत्या. त्यानंतर १९ एप्रिल आणि २ जूनला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना संकटामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ मार्चपासून रखडलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते ३० जूनदरम्यान घेतल्या जाणार आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, काही विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे न ढकलता ऑनलाईन पद्धतीनने घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने ही मागणी फेटाळून १० जूनपासून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या सुचना केल्याने आता या परीक्षा १० जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या या परीक्षा सुरुवातीला २३ मार्चपासून सुरू होणार होत्या. परंतु कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलून १९ एप्रिलपासून घेण्याचे पूनर्नियोजन करण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रभाव आणखीनच वाढल्याने या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र दोन जून पासूनही परीक्षा घेण्यास पूरक वातावणर नसल्याने या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याचे नियोजन सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी संबधित परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ऑनलाईन परीक्षाची मागणी फेटाळून १० जूनपासून ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बी. एस्सी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा१० जूनपासून सुरू होणार आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा १६ ऑगस्टपासून
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा येत्या १६ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे. उन्हाळी सत्र २०२१ मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय झाला. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित करण्यात आली होती. परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.