आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:57 PM2021-04-08T22:57:52+5:302021-04-09T00:30:31+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्या केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

The examinations of the University of Health Sciences will be held as per the schedule | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

Next
ठळक मुद्देअमित देशमुख : महाविद्यालयांना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्यामुळे त्या केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातील सोयी-सुविधा रुग्णांकरिता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. के. आर. कोहली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह राज्यभरातील पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत सहभागी झाले होते.

कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करु
कोरोनाची पहिली लाट ओसरली असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता दुसरी लाट आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नर्सिंग, डेंटल, फिजिओथेरपी या महाविद्यालयांनी चांगले कार्य केले आहे. दुसरी लाट थोपविण्यासाठी यापुढेही संपूर्ण ताकदीनिशी कोरोनावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

महाविद्यालयांनी कोविड नियमांचे पालन करावे
वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, याबाबत संस्थांनी गांभीर्यपूर्वक दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर संस्थेत कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असली तरी लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, अशी शासनाची भुमिका असून, लसीची कमतरता भासणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात आहे. लसींचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा, याकरिता केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: The examinations of the University of Health Sciences will be held as per the schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.