शासकीय तलावात खोदल्या विहिरी
By admin | Published: December 12, 2015 11:57 PM2015-12-12T23:57:09+5:302015-12-12T23:59:22+5:30
कारवाईची मागणी : परिसरातील शेतकरी संतप्त
येवला : सुरेगाव शिवारात शासकीय मालकीच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ५० एकर क्षेत्रातील तलावात काही शेतकरी दांडगाईने विहिरी खोदत असून, या विहिरी तत्काळ बुजवाव्यात, अशी मागणी येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, तलाठी पातळीवर तात्पुरते काम बंद केले असले तरी पुन्हा दांडगाईने काम सुरू केले जाण्याची शक्यता निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तळे राखावे आणि आमच्या जनावरांना पाणी चाखायला राहू द्यावे, असे आवाहन करून या तलावात असलेल्या विहिरी कायमस्वरूपी बुजवून टाकाव्यात आणि बेकायदेशीर विहिरी खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सुरेगाव शिवारात पालखेड डाव्या कालव्यालगत शासकीय मालकीच्या ५० एकर क्षेत्रात १९७२ साली दुष्काळी कामात हा तलाव तयार केला आहे. पिंपळखुटे या वनक्षेत्र शिवाराजवळ हा तलाव आहे. पालखेडच्या पाण्याने हा तलाव आवर्तनाच्या दरम्यान भरून दिला जातो. गवंडगाव, सुरेगाव, पिंपळखुटे, तळवाडे देवळाणे, भुलेगावसह परिसरातील हरणे, शेळ्यामेंढ्या व इतर जनावरे मोठ्या संख्येने पाणी पिण्यासाठी या तलावावर येतात. या बंधाऱ्यालगत शेतकऱ्यांच्या ५० ते ६० विहिरी त्यांच्या खासगी क्षेत्रात पूर्वीपासून आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी कायद्याला गुंडाळून थेट तलावातच चार विहिरी खोदण्याचा उद्योग केला. दोन विहिरी तर पूर्णत्वास गेल्या आहेत.
दरम्यान, तहसीलदार शरद मंडलिक यांनी या कार्यक्षेत्रातील चोपडे या तलाठी कर्मचाऱ्याला पाठवून सदर विहिरीचे काम बंद केले असले तरी कायमस्वरूपी या तलावातील विहिरी पूर्णत: बुजवून टाकाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. भाऊसाहेब भागवत, गणेश भागवत, रामेश्वर गायकवाड, सुभाष साळुंके, विलास भागवत, सिराज सय्यद, सोन्याबापू भागवत, फकीरा भागवत, ईश्वर सोमासे, बाबासाहेब पवार यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)